• इंतज़ाम कमेटी व नवयुवकांनी केले खीर व प्रसाद वाटप.
अजय कंडेवार, वणी:- अवघ्या देशभरात हजरत पैगंबरमोहम्मद सल्लल्लाहू अलैहि वसल्लम यांच्या शुभ जन्मदिनी ईद-ए मिलादुन्नबी साजरी होत असतांना तालुक्यातील कायर येथील हज़रत गाज़िशाह बाबा दरगाह इंतज़ाम कमेटी व युवकांनी सुद्धा मोठ्या उत्साहात गावात भव्य जुलूस काढून तसेच गावात खीर वाटप व प्रसाद वाटप करीत अतीशय उत्साहात साजरा करण्यात आला.
इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) कायर येथे अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. रविवारी (दि.९) मुख्यतः भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लीमबांधव सहभागी झाले होते. मिरवणूकित आकर्षक ही बाब की कोजागिरी पौर्णिमा व ईद-ए-मिलाद हा सण एकत्र आल्याने हज़रत गाज़िशाह बाबा दरगाह इंतज़ाम कमेटीने व नवयुवकांनी गावात खीर वाटप व प्रसाद वाटप करीत लक्ष वेधून घेत अतीशय उत्साहात ईद साजरी करण्यात आली.
ईद-ए-मिलाद हा सण मुस्लीम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दरवर्षी यानिमित्ताने मशिदींसह घरे, दुकाने व परिसरात सजावट करण्यात येते. मागील आठवडाभरापासून गावातील युवकांची लगबग पहावयास मिळते. दुपारी हज़रत गाज़िशाह बाबा दरगाह इंतज़ाम कमेटीचा नेतृत्वाखाली मिरवणुकीला दरगाह पासुन उत्साहाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी हज़रत गाज़िशाह बाबा दरगाह इंतज़ाम कमेटीचे सर्व सदस्य व गावातील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.