•राजू तुराणकर यांचा विशेष लेख नक्कीच वाचा.
वणी: भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र, गरीब मुला-मुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, अंध, पंगू, आजाऱ्यांवर औषधोपचार, बेकरांना रोजगार, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दुखी व निराशांना हिम्मत ही कर्मयोगी गाडगेबाबांची दशसूत्री.
हाच खरा धर्म आणि हीच खरी भक्ती आहे. गाडगेबाबांचा हाच वारसा राजूभाऊ तुराणकर गेल्या अनेक दशकांपासून जोपासत आहेत. संत गाडगेबाबांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाचे प्रबोधन केले. अंधश्रद्धेवर घनाघाती प्रहार केलेत. दीनदुबळ्यांची सेवा केली. हॆच कार्य राजूभाऊ तुराणकर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या अव्यातपणे करीत आहेत.
सन 2000 मध्ये राजूभाऊ धोबी समाज सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेच्या नावाप्रमाणेच त्यांनी समाज, संस्कृती आणि शिक्षण या विषयावर झपाट्याने काम करणं सुरू केलं. आज ते सर्वभाषिक धोबी परीट महासंघाचे महासचिव आहेत. ते एका पक्षाचे नेतेदेखील आहेत.
त्यांची मारेगाव जवळील मंगरूळ येथे नर्सरी आहे. ते सर्व समाजातील तरुणांना व्यवसायाची प्रेरणा देतात. त्यांना प्रोत्साहित करतात. अगदी प्रामाणिक मार्गदर्शनही करतात. या सर्व व्यापातून वेळ काढून सामाजिक कार्यातही ते अग्रेसर आहेत.
पूर्वी वणीतील गाडगेबाबा चौकात बाबांचा एक फोटो होता. राजूभाऊ आणि सूरज यांनी पुढाकार घेतला. ख्यातनाम मूर्तिकार आणि म्युरल आर्टिस्ट सुधाकर बुरडकर यांनी त्या चौकात संत गाडगेबाबांची मूर्ती म्हणजेच म्युरल तयार केलं. हे काम व्हावं ही राजूभाऊंची मनापासून इच्छा होती.
त्यांचे आई-वडील कांताबाई आणि किसनराव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 23 फेब्रुवारी 2016ला या मूर्तीचं लोकार्पण झालं. त्यामुळे आज या चौकात हे कायमस्वरूपी काम झालेलं आहे. महामानव समाजाला प्रेरणा देत असतात. चित्र, मूर्ती अथवा शिल्प ही माध्यमं आहेत. संत गाडगेबाबांचे कार्य आणि विचार यातून सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी ही राजू भाऊंची धडपड होती आणि ती अजूनही सुरूच आहे.
संतांची जयंती म्हटलं की भजन, पूजन, महाप्रसाद असे मर्यादित कार्यक्रम होत असतात. राजूभाऊंनी मात्र जयंती उत्सवाचे स्वरूप बदललं. या उत्सवात समाजोपयोगी कार्यक्रमांची भर घातली. गाडगेबाबांनी आजीवन प्रबोधनाची परंपरा चालवली. तोच आदर्श डोळ्यांसमोर ठेवत जयंती उत्सवात प्रबोधन हा मुख्य उपक्रम सुरू केला.
आजपर्यंत अनेक व्याख्याते आणि प्रबोधनकार या उत्सवात मार्गदर्शन करून गेलेत. यावर्षी म्हणजेच 2023 ला प्रबोधनकार सोपानदादा कनेरकर हे प्रबोधन करणार आहेत.
संत गाडगेबाबांनी अखेरपर्यंत शिक्षणाचा आग्रह धरला. घरातलं सोनं-नाणं विका; पण मुला-मुलींना शिकवा असं ते नेहमी सांगत. हाच आदर्श डोळ्यांपुढं ठेवत दत्तक- पालक योजना सुरू झाली. गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यासाठी राजूभाऊंनी अनेकांना प्रोत्साहित केलं. आज यातूनच अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
समाजाच्या विविध उपक्रमांसाठी हॉल असणं गरजेचं होतं. त्यातूनच निळापूर बामणी रोडवर आज समाज मंदिर उभं झालं. तिथं गोरगरीब मुलामुलींची लग्न होतात. प्रबोधनाचे कार्यक्रम होतात. आरोग्य असो किंवा अन्य विषयांवर शिबीर होत असतात. नुकत्याच झालेल्या नेत्र तपासणी शिबिरात 27 लोकांच्या डोळ्यांची यशस्वी ऑपरेशन झालीत. त्यांना नवीन दृष्टी मिळाली. सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या संत गाडगेबाबांची मूर्ती 2004 मध्ये स्थापन झाली.
राजूभाऊ आणि संस्था अनेक गरजूंना नियमित आर्थिक मदत करीत असतात. शिक्षण अथवा शैक्षणिक साहित्यासाठी सहकार्य करतात. केवळ जयंतीच नव्हे तर वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम इथे सुरूच असतात. भविष्यात या समाज मंदिरात अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू करण्याचा राजूभाऊंचा मानस आहे.
आता दरवर्षी जयंतीला भव्य शोभायात्रा निघते सलग दोन दिवस भरगच्च कार्यक्रम असतात. स्वच्छता अभियान, फळवाटप, सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या 20 वर्षांपासून सुरूच आहेत. यावर्षी जयंती महोत्सवाचे आयोजक धोबी समाज सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था आहे. सहयोजक सल्लागार समिती ड्रायक्लिन प्रेस असोसिएशन महिला समिती आहे.
महामानवांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी राजूभाऊ तुराणकर आणि सर्व समाजबांधव झटत आहेत. या दोन्हीसह परिसरातल्या अनेक ग्रामीण भागातील सदस्यही कार्यरत आहेत. संत गाडगेबाबांच्या विचारांवर प्रत्यक्ष कृती करीत आहे. त्या सर्वांचे अभिनंदन. संत गाडगेबाबांच्या 147 व्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप सदिच्छा.