Ajay,Wani : वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे अनेक वाहनधारकांचे ई-चलान थकीत आहेत. अशा वाहनधारकांसाठी यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी ई-चलान अभय योजना २०२६ जाहीर केली असून, पात्र थकीत चलानचा दंड भरताना २० टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत १ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२६ या ३० दिवसांच्या कालावधीत मिळेल. त्यामुळे ज्यांच्याकडे जुने ई-चलान बाकी आहेत, त्यांनी या कालावधीत आपला दंड भरून सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
नवीन ई-चलानसाठीही सवलत मिळणार आहे. १ डिसेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२७ या कालावधीत नवीन चलान जारी झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत दंड भरल्यास २० टक्के सूट मिळेल. तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या पात्र चलानांवरही २० टक्के सवलत मिळणार आहे. मात्र, न्यायालयातील प्रकरणांचा निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसार होईल. ही सवलत केवळ पात्र चलानांसाठी असल्याने वाहनधारकांनी आपले ई-चलान तपासून घ्यावे. ३० दिवसांची ही संधी लक्षात घेऊन नागरिकांनी वेळेत दंड भरावा, असे आवाहन यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.

