Ajay Kandewar :- झरी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत सध्या विविध अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याच्या चर्चा स्थानिक पातळीवर जोर धरू लागल्या आहेत. वरली मटका, अवैध देशी दारू विक्री, वाळू तस्करी, अनधिकृत प्रवासी वाहतूक तसेच कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, नुकतेच नवीन पोलीस निरीक्षक मुकुटबन येथे रुजू झाल्यानंतर त्यांच्या रुजू होण्याच्या प्रारंभिक कालावधीचा गैरफायदा घेत काही घटकांकडून मनमानी कारभार सुरू असल्याची चर्चा परिसरात ऐकू येत आहे. विशेष म्हणजे, पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडून जिल्ह्यातीलच “पुसद पोलीस स्टेशनमध्ये” कार्यरत असताना कारवाई झालेल्या “कर्मचाऱ्यावर” मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायिकांकडून वसुलीची जबाबदारी देण्यात आल्याचा आरोप चर्चेचा विषय ठरत आहे.या कथित व्यवस्थेमुळे वरली मटका, अवैध देशी दारू विक्री, वाळू तस्करी, प्रवासी वाहतूक व कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमित स्वरूपात वसुली होत असल्याच्या चर्चा जनमानसात पसरल्या आहेत. या माध्यमातून अवैध व्यवसायांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याचा आरोपही व्यक्त केला जात आहे.
मुकुटबन परिसरात अवैध धंद्यांना उघडपणे चालना मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढीस लागली आहे. विशेषतः मटका व दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच वाळू तस्करी व कोळसा वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलावर मोठा परिणाम होत असल्याचेही बोलले जात आहे.
तर ……सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी……..
या संपूर्ण प्रकरणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र, या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून केली जात आहे.जर या चर्चांना तथ्यात्मक आधार आढळून आला, तर संबंधितांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि मुकुटबन परिसरातील सर्व अवैध व्यवसायांवर तातडीने आळा घालावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत..
क्रमशः……

