Ajay Kandewar, Wani :-चिखलगाव ग्रामपंचायतीत सत्ताकारणाला नवा, पण स्फोटक वळण मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. एकाच पॅनलचे सर्व सदस्य निवडून आल्यानंतरही सत्तेचा समतोल राखला गेला नाही, उलट सरपंच–उपसरपंच पदे “घरातच” बहुमताच्या खेळीने निश्चित केल्याचा आरोप गावकऱ्यांतून होत आहे. सूत्रांनुसार, राजीनामा दिलेल्या आठ सदस्यांपैकी किमान दोन नावे उपसरपंचपदासाठी आधीच ठरली होती व तसे शब्दही दिले गेले होते, अशी गावभर चर्चा आहे. मात्र अंतिम टप्प्यावर निर्णय बदलल्याने असंतोषाची ठिणगी पडली, असे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर “एकाधिकारशाही” पद्धतीने कारभार चालवला जात असल्याचा आरोप ठळक होत आहे. लोकप्रतिनिधींना निर्णयप्रक्रियेतून डावलणे, वचनभंग, आणि बहुमताचा गैरवापर—या मुद्द्यांवरूनच आठ सदस्यांनी एकत्रित राजीनामे दिल्याची चर्चा आहे. कायद्याच्या चौकटीत पाहता, ग्रामपंचायत अधिनियमातील सामूहिक निर्णयप्रक्रिया, सभांचे मिनिट्स, ठरावांची वैधता आणि पदनियुक्तीतील पारदर्शकता या बाबी तपासणीच्या कक्षेत येतात.
विशेष म्हणजे, राजीनाम्यानंतरही उरलेल्या सदस्यांवर दबाव, समजूत काढण्याचे प्रयत्न (“लोण्या लावणे”) सुरू असल्याच्या चर्चा गावात रंगल्या आहेत. मात्र आता सूर बदलल्याचे दिसते—“मेरी ही सुनो” असा एकतर्फी कारभार नको, “अब हमारीच सुनो भाऊ” अशी स्पष्ट भूमिका सदस्यांकडून मांडली जात असल्याचं बोलल्या जात आहे. यामुळे सरपंच,उपसरपंचांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, विकासकामांवरील निर्णय, निधीवाटप आणि ठरावांची कायदेशीरता याबाबत चौकशीची मागणी जोर धरत आहे.

