Ajay Kandewar,Wani:-गैरजमानती वॉरंट बजावणी करण्याकरीता गेले असता राजेंद्र कुळमेथे यांना जागीच ठार केलें व इतर पोलिस कर्मचा-यावर लाकडी दांडक्याने हल्ला करुन जख्मी केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. देशमुख यांनी दिला. अनिल लेतू मेश्राम (४१) रा. हिवरी, ता. मारेगाव,जिल्हा यवतमाळ असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
मारेगाव तालुक्यांत २६ डिसें.२०१८ रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी अनिल लेतु मेश्राम यांचेवर गैरजमानती वॉरंटची बजावणी करण्याकरीता पो.शिपाई राजेंद्र कुडमेथे, पोलिस हवालदार मधुकर निळकंठ मुके व प्रमोद खुपरे हे तिघेही वाहनाने हिवरी येथे गेले असता आरोपी हा वॉरंटची बजावणी करण्यास अडथळा निर्माण करुन लोखंडी दांडक्याने राजेंद्र कुडमेथे या पोलिस कर्मचारी याला डोक्यावर वार केलें असतां तो जागीच ठार झाला व ईतर पोलिस कर्मचा-यावर लाकडी दांडक्याने हल्ला करुन त्यांना जख्मी केले. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व शवविच्छेदन अहवालावरुन मधुकर मुके यांनी पो.स्टे. मारेगाव येथे घटनेचा रिपोर्ट दिला.पो.स्टे. मारेगाव येथे कलम ३०२, ३०७, ३५३, ३३३, ३३२, ३२४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर यवतमाळ पोलीस अधिक्षक यांच्या सूचननुसार वणी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस तपास अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले
यावरून पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए. एम. देशमुख यांनी समक्ष पो.स्टे. मारेगाव, येथील अप.क. ३९९/२०१८ कलम ३०२, ३०७, ३५३, ३३३, ३३२, ३२४ भा.दं.वि.अंतर्गत फौजदारी प्रकरण सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणामध्ये २० डिसें रोजी आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द झाला व आरोपी अनिल लेतु मेश्राम, वय ४१ वर्षे रा. हिवरी, ता. मारेगाव जि. यवतमाळ याला ३०२ भा.दं.वि. मध्ये मनुष्यवध प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.