Sunday, August 23, 2026
HomeUncategorized३०-४० वर्ष झाले आताही घर-घर......

३०-४० वर्ष झाले आताही घर-घर……

Ajay, Wani:- तालुक्यातील राजूर कॉ परिसरातील वॉर्ड क्र. ४,५ मध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या वेकोलीग्रस्त नागरिकांच्या घरांच्या जागेचा प्रश्न आता ग्रामसभेत मांडण्यात आला. मागील ३० ते ४० वर्षांपासून, तर काही कुटुंबे त्याहीपेक्षा अधिक काळ या जागेवर वास्तव्यास असूनही त्यांच्या घरांच्या जागेला अधिकृत स्वरूप मिळालेले नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे येथे संसार करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घराच्या जागेचा कायमस्वरूपी आधार मिळावा, यासाठी ग्रामस्थांनी राजूर ग्रामसभेत ग्रामसेवक यांना निवेदन दिले.

या निवेदनासाठी राणी सीडाम यांनी पुढाकार घेतला.ग्रामस्थांची मागणी स्पष्ट आहे की, १ जानेवारी २०११ पर्यंत शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांच्या निवासी अतिक्रमणांचा शासनाच्या नियमानुसार विचार करून ते नियमित करण्यात यावेत. त्यासाठी प्रत्येक घराची स्वतंत्र मोजणी करून प्रत्यक्ष किती जागा वापरात आहे, याची नोंद घ्यावी आणि पात्र कुटुंबांना त्या जागेचे पट्टे द्यावेत. त्यानंतर संबंधितांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे, अशी मागणी आहे. अनेक वर्षांपासून वास्तव्य असल्याचे मतदान यादी, वीजबिल, मालमत्ता कराच्या पावत्या, नमुना ८ आणि इतर कागदपत्रांमधून सिद्ध होत असल्याने या पुराव्यांचा आधार घेऊन पात्र नागरिकांवर निर्णय घ्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

विशेष म्हणजे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या २०२४ मधील सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या वॉर्ड क्रमांक ४ मधील कुटुंबांना त्यांच्या सध्याच्या राहत्या जागेवरच घरकुलाचा लाभ मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. म्हणजेच, “ज्या जागेवर वर्षानुवर्षे आमचे घर आहे, ती जागा नियमानुसार आमच्या नावावर करून द्या आणि आम्हाला घरकुलाचा लाभ मिळवून द्या,” अशी या नागरिकांची मुख्य भूमिका आहे. वेकोलीग्रस्त भागातील अनेक कुटुंबे पिढ्यान्‌पिढ्या येथे राहत असताना त्यांच्या घरांच्या जागेचा प्रश्न प्रलंबित राहणे हा अन्याय असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, शासनाच्या नियमांचा आधार घेऊन प्रशासनाने या प्रश्नावर ठोस आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page