Saturday, May 9, 2026
HomeBreaking Newsसेनेचा ढाण्या वाघ माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर अनंतात विलीन.....

सेनेचा ढाण्या वाघ माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर अनंतात विलीन…..

Ajay Kandewar, Wani :- वणी विधानसभेचे माजी आमदार, शिवसेनेचे निष्ठावंत नेतृत्व आणि जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे विश्वासभाऊ नांदेकर अखेर अनंतात विलीन झाले. मंगळवार, 23 डिसेंबर रोजी त्यांच्या मूळ गाव पठारपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विश्वासभाऊंच्या जाण्याने केवळ एक नेता नाही, तर जनतेचा आधारवड हरपल्याची भावना सर्वत्र दिसून येत होती.

21 डिसेंबर रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली आणि ही दुःखद बातमी वणी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. मुंबईहून वणी आणि पुढे पठारपूरकडे निघालेल्या त्यांच्या पार्थिवासोबत अश्रूंचा आणि आठवणींचा अखंड प्रवास सुरू होता. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता सजविलेल्या वाहनातून शेकडो वाहनांच्या ताफ्यासह पार्थिव अंतिम प्रवासासाठी निघाले तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर निःशब्द प्रार्थना होत्या.

टिळक चौक असो की गणेशपूर, पेटूर, कायर असो की लहानसे खेडे—प्रत्येक ठिकाणी लोकांनी थांबून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. पठारपूर येथे त्यांच्या राहत्या घरी शेवटचे विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुतणे विशाल नांदेकर यांनी मुखाग्नी दिली. तो क्षण पाहताना उपस्थित हजारो डोळे पाणावले होते.अंत्यसंस्कारावेळी पालकमंत्री संजय राठोड, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार संजय देरकर, माजी आमदार वामनराव कासावार, संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच विश्वासभाऊंच्या साधेपणा, स्पष्टवक्तेपणा आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण काढत भावनिक श्रद्धांजली अर्पण केली.मोठ्या जनसागरामुळे पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. शासकीय प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन हिंगोले आणि तहसीलदार निखिल धूळधर उपस्थित होते. पठारपूरच्या मातीने आपल्या लाडक्या सुपुत्राला अश्रूंनी ओलावलेला अखेरचा निरोप दिला.विश्वासभाऊ नांदेकर यांच्या निधनाने वणी विधानसभा मतदारसंघातील राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

अंत्यसंस्काराच्या वेळी सर्व मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. अंत्यसंस्कार दरम्यान शासकीय प्रतिनिधी म्हणून वणीचे उप विभागीय अधिकारी डॉ. नितीन हिंगोले, तहसीलदार निखिल धूळधर उपस्थित होते. यावेळी मध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची हजेरी लक्षात घेता पोलिस व वाहतूक पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. येणाऱ्या लोकांचे वाहने उभे करण्यासाठी पठारपूर गावालगत एका शेतात पार्किंग स्थळ तयार करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page