Saturday, May 2, 2026
HomeBreakingवणीत उबाठा-काँग्रेसचा ‘कामापुरता मामा’ राजकारण उघड...?

वणीत उबाठा-काँग्रेसचा ‘कामापुरता मामा’ राजकारण उघड…?

Ajay Kandewar, Wani: वणी नगरपरिषद निवडणूक ही भाजपासाठी विजयाची, तर तथाकथित महाविकास आघाडीसाठी राजकीय दांभिकपणाची आरशी ठरली आहे. निवडणुकीपूर्वी हातात हात घालून एकत्र फिरणारे उबाठा गट आणि काँग्रेस, निकाल लागताच एकमेकांचे ताशेरे ओढू लागल्याचे चित्र वणीत पाहायला मिळत आहे. भाजपाने नगराध्यक्षांसह १७ जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले, तर उबाठा आणि काँग्रेस पराभव झेलूनही आत्मपरीक्षणाऐवजी सत्तेच्या खुर्चीसाठी एकमेकांच्या गळ्यात पडल्याची चर्चा रंगली आहे.

निवडणूक एकत्र, पण स्वीकृत सदस्यासाठी — हाच वणीतील महाविकास आघाडीचा खरा चेहरा असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे. उबाठा म्हणतो “जागा जास्त, गटनेता आमचाच”, तर काँग्रेस म्हणते “आघाडी म्हणजे समान वाटा” चर्चेच्या नावाखाली झालेली खेचाताणी अखेर फिस्कटली आणि दोन्ही पक्षांनी स्वतंत्र गटनेते जाहीर करत महाविकास आघाडीचे प्रेत वणीत पुरल्याचीच भावना निर्माण झाली आहे.

या साऱ्या राजकारणामुळे संतापाचा सूर उमटू लागला आहे. काम असेल तेव्हा एकत्र, नाही जमले तर हीच का लोकशाही? “काम के समय में एक आओ, नाही पटले तर बाहेर जाओ” ही मानसिकता शहराच्या राजकारणात मुरत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वीकृत सदस्याची खुर्ची मोठी ठरतेय का, असा थेट सवाल आता उभा राहिला आहे.

विशेष म्हणजे, उबाठा आणि काँग्रेसने खरंच एकदिलाने निर्णय घेतला असता, तर भाजपाला रोखण्याची संधी निर्माण झाली असती. पण अहंकाराच्या लढाईत दोघेही आपापले झेंडे उंचावण्यात गुंतले आणि भाजपाला आयते मैदान मोकळे करून दिले. निवडणुकीपुरती एकजूट आणि सत्तेच्या तुकड्यावरून फाटाफूट?हीच जर महाविकास आघाडीची ओळख असेल, तर वणीकर जनतेने आता या ‘कामापुरत्या मामां’ना ओळखण्याची वेळ आली आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page