Vidarbh News ,Ajay :- शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला अखेर निर्णायक वळण मिळाले असून वणी नगर परिषदेकडून संबंधित विभागांना कारवाईचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या आदेशानंतर आता बुधवार सकाळपासून शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असून, नगर परिषद आणि वणी पोलीस प्रशासन संयुक्तपणे मैदानात उतरणार असल्याचे खात्रीलायक सांगितले.

विशेष म्हणजे, या कारवाईसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्तालाही मंजुरी मिळाल्याने प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे आणि वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष कारवाईत सहभागी होणार आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, रस्ते, फुटपाथ, नाल्यांवरील अतिक्रमणांसह परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या शेड्स आणि इतर संरचनांवरही मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक अतिक्रमणधारकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना अप्रत्यक्षपणे स्पष्ट संदेश देण्यात आला असून, “स्वतःहून अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा उद्यापासून प्रशासनाची कारवाई अटळ आहे,” असा इशारा दिला जात आहे. कारवाईदरम्यान कोणत्याही प्रकारचा राजकीय, सामाजिक किंवा इतर दबाव स्वीकारला जाणार नसल्याचेही प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.शहरातील प्रमुख रस्ते, चौक, फुटपाथ आणि नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूक, पादचारी आणि स्वच्छतेच्या समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. त्यानंतर नगर परिषद प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
आदेश…
महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७७ (१) ग अन्वये प्राप्त अधिकारान्वये वणी नगर परिषद क्षेत्रातील एल. आय. सी चौक ते बॅस स्टॅन्ड ते तहसिल चौक ते टिळक चौक ते आंबेडकर चौक ते टागोर चौक ते सवौद्य चौक ते श्री. रंगनाथ स्वामी मंदीर चौक या मार्गावरील तसेच खाती चौक ते जटाशंकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कृषी उत्पन्न बाजर समिती पर्यंत, या मुख्य रस्ते बाजार पेठ व सार्वजनिक उपद्रव असणारे तसेच टिळक चौक ते हिंदुहृदय सम्राट चौकापर्यंत म्हणजे वणी शहर हद्दीपर्यंत सर्व अतिक्रमण काढुन जागा मोकळी करण्याबाबत आपणांस आदेशित करण्यात येत आहे. बुधवारपासून सतत वणी शहरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावे.

