Thursday, November 26, 2026
HomeBreakingDanger.....नवीन टाकी खोदकामाचा Vibrate ने जुन्या टाक्याही जाणार चुलीत.....

Danger…..नवीन टाकी खोदकामाचा Vibrate ने जुन्या टाक्याही जाणार चुलीत…..

Ajay Kandewar,Wani :- वणी शहरात नवीन पाण्याची टाकी उभारण्याच्या नावाखाली सुरू असलेले खोदकाम आता संभाव्य दुर्घटनेचे गंभीर कारण ठरू शकते, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. नवीन टाकीच्या बांधकामासाठी जुन्या पाण्याच्या टाक्यांच्या अगदी जवळच मोठमोठ्या खडकांचे खोदकाम सुरू असून, या प्रक्रियेदरम्यान खडक अक्षरशः व्हायब्रेट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या कंपनांचा परिणाम शेजारील जुन्या पाण्याच्या टाक्यांवरही होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, नवीन बांधकाम आणि जुन्या टाक्यांमधील अत्यल्प अंतर लक्षात घेता जुन्या टाक्यांच्या मूळ संरचनेला तडे जाणे, बांधकाम कमकुवत होणे किंवा गंभीर नुकसान होण्याचा धोका नाकारता येत नाही. नवीन टाकी उभारण्याच्या नादात वर्षानुवर्षे वापरात असलेले जुने बांधकामच धोक्यात येणार असेल, तर हा विकास नेमका कोणाच्या हिताचा? संभाव्य दुर्घटनेत मोठी जीवितहानी घडण्याची वेळ येण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होणे आवश्यक आहे. हा धोका केवळ जुन्या टाक्यांपुरता मर्यादित नसून, नवीन खोदकामापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या मैदानालाही कंपनांचे हादरे जाणवत असल्याची बाब चिंताजनक आहे. या मैदानावर विद्यार्थी उपस्थित असताना खोदकामामुळे निर्माण होणारे हादरे जाणवत असतील, तर जवळच असलेल्या जुन्या पाण्याच्या टाक्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर असेल, याची कल्पना प्रशासनाने करावी.

या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत ॲड. अमोल पांडुरंग टोंगे यांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात ठाम भूमिका घेत मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांना लेखी निवेदन दिले आहे. नवीन टाकीच्या बांधकामासाठी सुरू असलेले खोदकाम तातडीने थांबवावे, तज्ज्ञ स्ट्रक्चरल इंजिनिअर आणि भूगर्भशास्त्रज्ञांकडून संपूर्ण परिसराची तांत्रिक तपासणी करावी आणि जुन्या टाक्यांच्या सुरक्षिततेला धोका नसलेल्या पर्यायी जागेवर नवीन टाकी उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार संजय देरकर, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वणी आणि माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, मैदानापर्यंत कंपनांचे हादरे पोहोचत असतील, तर जुन्या टाक्यांच्या सुरक्षिततेबाबत केवळ अंदाजावर काम चालणार नाही. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक सुरक्षिततेची खात्री करणे गरजेचे आहे. एखादी टाकी कोसळल्यानंतर पंचनामे, चौकशा आणि जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा दुर्घटना होण्याआधीच बांधकाम थांबविणे शहाणपणाचे ठरणार आहे. वणीकरांच्या जीविताचा प्रश्न असल्याने या कामाला तात्काळ स्थगिती देऊन सुरक्षिततेची खात्री होईपर्यंत खोदकाम बंद ठेवावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page