Ajay,Wani:- दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच चोरट्यांनी जणू दिवाळीच साजरी करण्याच्या इराद्याने थेट बँकेलाच लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना झरि झामणीतील पाटण येथे समोर आली आहे. महाराष्ट्र बँकेच्या स्थानिक शाखेच्या मागील भिंतीला गोलाकार भगदाड पाडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे. एखाद्या चित्रपटातील क्राईम सीनला शोभेल अशा पद्धतीने घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, बँकेच्या मागील भिंतीला गोलाकार छिद्र पाडून आत प्रवेश केल्याची बाब सकाळी उघडकीस आल्यानंतर ही बातमी पाटण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. मात्र, या घटनेबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती समोर आलेली नाही. बँकेतून नेमकी किती रोकड किंवा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या, चोरट्यांनी कोणत्या पद्धतीने डाव साधला, बँकेतील लॉकर अथवा इतर साहित्याला लक्ष्य करण्यात आले का, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही.
दरम्यान, प्राथमिक स्तरावर या चोरीत सहा ते सात लाख रुपयांची रोकड अथवा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, चोरीचा नेमका आकडा बँकेच्या अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याची बाबच या घटनेचे गांभीर्य अधोरेखित करणारी आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. दिवाळीच्या आनंदात चोरट्यांचीच ‘लक्ष्मीपूजा’ करण्याची तयारी होती की काय, असा उपरोधिक सवाल परिसरात चर्चिला जात आहे.चोरट्यांनी नेमका किती मोठा डल्ला मारला, हे अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार असले तरी पाटणमधील या घटनेने बँक सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता पाटण पोलिसांच्या तपासात या ‘भिंतीतील भगदाडा’मागील संपूर्ण रहस्य कधी उलगडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

