Ajay,Wani:- तालुक्यातील कोळसा प्रदूषणाचा प्रश्न आता अधिकच गंभीर बनला असून, लालपुलिया परिसरातील कथित अवैध कोळसा प्लॉट राजूर रिंग रोडवर स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, राजूर रिंग रोड परिसरात नव्याने कोळसा प्लॉट सुरू करण्याच्या दृष्टीने जागेची साफसफाई सुरू असल्याचे समोर येत आहे. एका ठिकाणचा प्रदूषणाचा प्रश्न दुसऱ्या ठिकाणी हलवून नागरिकांच्या माथी नवा त्रास मारण्याचा हा प्रयत्न असेल, तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका लढा संघटनेने घेतली आहे. अशा कोळसा प्लॉटधारकांना कोणतीही प्रशासकीय परवानगी देण्यात येऊ नये, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कोणतीही संमती अथवा परवानगी देऊ नये आणि स्थानिक प्रशासनानेही संबंधित जागेवर कोळसा प्लॉट उभारण्यास मुभा देऊ नये, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. संबंधितांना तातडीने जाहीर नोटीस बजावून हा प्रकार थांबवावा, अन्यथा प्रशासनाच्या भूमिकेविरोधातही संघर्ष तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राजूर, भांडेवाडा, सोनापूर, बोदाड, पळसोनी, मेघदूत, कळमना आणि चिखलगाव (राजूर रिंग रोड) परिसरातील नागरिक आधीच कोळसा डेपो, डोलोमाईट कंपन्या आणि अवजड वाहतुकीच्या प्रदूषणाने त्रस्त आहेत. त्यामुळे राजूर रिंग रोड परिसरात नव्याने कोळसा प्लॉट सुरू करण्याच्या हालचालींना वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे. महामार्गालगत ५०० मीटरच्या आतील कोळसा डेपो तसेच राजूर रिंग रोडलगतचे सर्व कोळसा डेपो बंद करावेत, अवजड वाहनांची वाहतूक थांबवावी, रस्त्याची दुरुस्ती करावी आणि मागील १५ ते २० वर्षांत पर्यावरण व आरोग्यविषयक शिबिरे न घेतल्याच्या मुद्द्यावर चौकशी करून लेखी उत्तर द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, सात दिवसांत ठोस बैठक व निर्णय न झाल्यास १३ नोव्हेंबर रोजी राजूर रिंग रोडवर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राजूर रिंग रोडवर नव्याने कोळसा प्लॉट उभे राहू नयेत आणि लालपुलियातील कथित अवैध कोळसा प्लॉटचा विस्तार अन्यत्र(राजूर रिंग रोडवर)होऊ नये, हा या चक्काजाम आंदोलनामागील प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवीण खानझोडे यांच्या रट्ट्याकडे नागरिकांच्या नजरा....
लढा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण खानझोडे यांनी यापूर्वीही जनतेच्या विविध प्रश्नांवर सातत्याने निवेदने देऊन पाठपुरावा केला असून, अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राजूर रिंग रोडवरील कोळसा प्लॉटचा संभाव्य धोका आणि प्रदूषणाचा गंभीर प्रश्नही त्यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या निवेदनावर प्रवीण खानझोडे यांच्यासह अॅड. रुपेश ठाकरे, राहुल क्षीरसागर, राहुल कुतरमारे, मनोज डेंगळे, शिवा मोरे, रोशन गारपेल्लीवार, अतुल चांदेकऱ, इमामुल हसन, मंगेश दैटे, भगवान मोहिते आणि धनंजय भोयर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता प्रशासन या मागण्यांना गांभीर्याने घेऊन संभाव्य कोळसा प्लॉटला वेळीच प्रतिबंध घालते की नागरिकांना १३ नोव्हेंबरला रस्त्यावर उतरून चक्काजाम करावा लागतो, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

