Monday, June 15, 2026
HomeBreakingखळबळजनक....... "भाई को मिलना है तुमसे"........?

खळबळजनक……. “भाई को मिलना है तुमसे”……..?

Vidarbh News,Wani:- मुकुटबन परिसरातील कोट्यवधी रुपयांच्या रस्ता बांधकामातील कथित गैरव्यवहार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप रामदासजी भोयर यांना आता थेट जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. रस्ता कामातील अनियमिततेविरोधात सातत्याने आवाज उठविणाऱ्या भोयर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व वणी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने गुन्हा नोंदविण्याची तसेच पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

भोयर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 11 जून 2026 रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर आलेल्या एका कॉलमध्ये “भाऊ आले आहेत, तुला बघणार आहेत” अशा शब्दांत दबाव टाकण्यात आला. त्यांनी भेटण्यास नकार दिल्यानंतर “तू जिथे आहेस तिथे आम्ही येतो आणि तुला बघतो” अशी धमकीवजा भाषा वापरण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर काही वेळातच काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या घराजवळ चौकशी केल्याने संशय अधिक बळावला आहे.

बोरी–पाटण–मुकुटबन–पुराड–वेलाबाई फाटा राज्य महामार्ग क्रमांक 315 वरील सिमेंट काँक्रीट रस्ता, सीसी ड्रेन व डिव्हायडर कामातील कथित निकृष्ट दर्जा आणि निधीच्या अपव्ययाविरोधात आंदोलन व तक्रारी केल्यानंतरच या घटना घडल्याचा दावा भोयर यांनी केला आहे. तसेच एका माजी राजकीय पदाधिकाऱ्याच्या घरी संशयितांची बैठक झाल्याची माहिती मिळाल्याचे नमूद करत संबंधितांचे मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि संपर्कांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी 2023 मध्ये देखील काँक्रीट रस्ता कामातील कथित गैरप्रकारांबाबत तक्रार केल्यानंतर स्वतःवर हल्ला झाल्याची आठवण भोयर यांनी तक्रारीत करून दिली आहे. “भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणाऱ्यांना धमकावणे ही लोकशाहीसाठी धोक्याची बाब आहे,” असे सांगत स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे वणी व मुकुटबन परिसरात खळबळ उडाली असून पोलिस प्रशासन या गंभीर तक्रारीवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page