Saturday, May 2, 2026
HomeBreaking Newsश्री रंगनाथ स्वामी पतसंस्था क्रिकेट संघाचा ऐतिहासिक पराक्रम....

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था क्रिकेट संघाचा ऐतिहासिक पराक्रम….

Ajay Kandewar, Wani :— कोपरगाव ( जि. अहमदनगर) येथे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन लिमिटेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुधन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी या संघाने उल्लेखनीय आणि दणदणीत कामगिरी करत वणी शहराचा गौरव अभिमानाने उंचावला आहे. या यशामुळे संपूर्ण वणी शहरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, हा विजय वणीकरांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.

दिनांक 26 ते 28 डिसेंबर 2025 दरम्यान समता इंटरनॅशनल स्कूल ग्राउंड, कोपरगाव येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक नामांकित पतसंस्थांचे संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक सामन्यांतून वाट काढत, विजय बोरपे (शाखा व्यवस्थापक) यांच्या नेतृत्वाखाली श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था क्रिकेट संघाने सलग सहा सामने जिंकत थेट अंतिम फेरीत धडक दिली.अंतिम सामन्यात देखील संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेत फर्स्ट रनर-अपचे मानाचे स्थान पटकावत ट्रॉफी व रोख बक्षीस आपल्या नावावर केले. या निर्णायक सामन्यात आशिष ढवस आणि अभिजीत गाडगे यांनी अप्रतिम खेळ करत ‘मॅन ऑफ द मॅच’चा मान पटकावला.

संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघाने दाखवलेली शिस्तबद्ध खेळशैली, एकजूट, संयम आणि जिद्द प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवून देणारी ठरली. प्रत्येक सामन्यातील लढाऊ वृत्ती आणि आत्मविश्वासामुळे संघाने प्रतिस्पर्ध्यांवर आपली ठसठशीत छाप सोडली.या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस – ₹35,555,द्वितीय बक्षीस – ₹25,555,तृतीय बक्षीस – ₹15,555,चतुर्थ बक्षीस – ₹1,155 तसेच‘मॅन ऑफ द सिरीज’ – ₹11,000 ‘मॅन ऑफ द मॅच’ – ₹1,500 अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती, ज्यामुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढली होती. हा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, कोपरगावचे आमदार काळे साहेब तसेच सुधनचे संस्थापक संदीप कोयटे यांच्या हस्ते पार पडला.

या यशाबद्दल वणी शहरातील नागरिक,पतसंस्थेचे सभासद, कर्मचारी तसेच क्रिकेटप्रेमींनी श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था क्रिकेट संघावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हा विजय केवळ एका संघाचा नसून संपूर्ण वणी शहराचा गौरव असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था क्रिकेट संघाने मिळवलेले हे यश वणीच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल, यात शंका नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page