अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील कायर गावात सुरू असलेल्या देशी दारू दुकानाविरोधात ग्रामस्थांचा प्रचंड आक्रोश उसळला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या दुकानाविरोधात एकमुखाने ठराव पारित करण्यात आला असून, तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

कायर–बाबापूर मार्गावरील मालमत्ता क्र. ९५४/५ येथे लायसन्स क्र. CL-III.NO.150, सन 2024-25 अन्वये देशी दारू विक्रीस अधिकृत परवानगी होती. मात्र हे दुकान बेकायदेशीररीत्या मालमत्ता क्र. ८०४ या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असून, ग्रामपंचायतीकडून कोणतेही ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न घेता दुकान सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने उत्पादन शुल्क विभाग तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांना लेखी निवेदन दिले असले तरी, अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संताप वाढला आहे.
ग्रामसभेत सरपंच नागेश धनकसार, उपसरपंच माया मोहुले, सदस्य नंदकिशोर अंबोरे, सचिव व इतर सदस्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. चर्चेदरम्यान सर्व सदस्यांनी एकमुखाने ठराव मंजूर करून, “बिनपरवानी दुकान तात्काळ बंद करावे, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल,” असा ठाम इशारा दिला.विशेष म्हणजे या प्रश्नावर महिलांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. गावातील अनेक महिला ग्रामसभेत सहभागी होऊन त्यांनी प्रशासनाला हाक दिली की, “दारू दुकानामुळे आमच्या संसारात कलह वाढतो, तरुण पिढी बिघडते. आमच्या घराघरात अश्रूंची किनार थांबवायची असेल तर तात्काळ या दुकानावर कारवाई करा,” अशी भावनिक विनंती महिलांनी केली. ग्रामस्थांचा राग आणि महिलांची हतबलता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने तोडगा काढणे गरजेचे ठरले आहे. अन्यथा या प्रश्नावरून कायर ग्रामस्थ रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

