अजय कंडेवार, : राजुरा तालुक्यातील गोयेगाव व परिसरात मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या झंझावाती दौर्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी शेकडो युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जंगी प्रवेश करून पक्षाच्या अजेंड्याला आपला कौल दिला.

२५ ऑगस्ट रोजी हनुमान मंदिर परिसरातील खुल्या मैदानात आयोजित प्रवेश सोहळ्यात युवकांनी मनसेच्या झेंड्याखाली प्रवेश केला. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व अमन अंधेवार यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने युवक मनसेत दाखल झाले.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अमन अंधेवार यांनी पक्षाची ध्येयधोरणे, कार्यपद्धती व राजसाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्राची मांडणी केली. “जनसामान्यांच्या प्रश्नांवर लढा देणे, गावोगाव शाखा वाढविणे आणि जनसंपर्क दृढ करणे हेच पक्ष बळकट करण्याचे मुख्य साधन आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट शब्दात स्थानिक आजी-माजी नेत्यांना लक्ष्य करत, “गावातील गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करून हे नेते गायब झाले आहेत. मात्र हे गाव माझ्यासाठी नवे नाही, येथील प्रत्येक समस्येवर आम्ही ठामपणे लढा देणार आहोत,” असे वक्तव्य केले.
गोरगरीब आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारी संघटना म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युवकांनी पसंती दिल्याचे अंधेवार यांनी सांगितले. “गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी मनसे कार्यरत राहणार आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेवार यांच्या या झंझावाती दौर्याला राजुरा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या प्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, रमेश काळबांधे, सुनील गुढे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यात विविध समस्यांना अधोरेखित करून त्यावर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासनही देण्यात आले.

