Ajay kandewar,वणी : शहरातील पंचशील नगर परिसरात उशिरा रात्री घडलेल्या कारवाईत वणी पोलिसांनी गुटखा–तंबाखू माफियांना जबरदस्त धक्का दिला आहे. 112 वर नागरिकांकडून मिळालेल्या तातडीच्या माहितीवर पोलिसांनी विजेच्या वेगाने कारवाई करत एमएच-24 बीएल-7051 या वाहनातून उतार होत असलेला सुगंधित तंबाखूचा साठा उघडकीस आणला.

हाच ” तो “सुगंधित तंबाखूचा साठा जप्त...
पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच रस्त्याच्या कडेला टाकून दिल्यासारखा पडलेला रजनीगंधा, इगल तसेच इतर सुगंधित तंबाखूचा मोठा माल आढळून आला. तपासात हा माल संबंधित वाहनातून उतार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली. एकूण मालाची अंदाजे किंमत सुमारे 57 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.वणी शहरात अशा प्रकारचा प्रकार प्रथमच उघड होत असून पोलिसांच्या जलद आणि अचूक प्रतिसादामुळे गुटखा रॅकेटचे डोके वर काढण्याआधीच मोडीत काढले गेल्याचे बोलले जात आहे. जप्त केलेला माल पुढील कारवाईसाठी अन्न औषध विभागाच्या पुरवठा कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
या धाडसी कारवाईनंतर वणी शहरात चर्चा रंगल्या असून सामान्य नागरिकांनी पुढाकार घेत दिलेल्या माहितीमुळेच गुटखा माफियांच्या मुसक्या आवळण्यास मोठी मदत झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. एकीकडे अवैध तंबाखू विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक बळकट झाल्याची भावना व्यक्त होत आहे.नागरिक जागे, पोलिस तत्पर – वणीत अवैध व्यापारावर आता मोठा घाव.
•”त्या” ज्योती किराणा वर धाड कधी…. ?
“वणीतील ज्योती किराणा दुकानावर काही दिवसांपूर्वी अन्न व औषध विभागाने मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करून कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही हेच दुकान पुन्हा तंबाखू विक्रीस सज्ज झाल्याची माहिती स्थानिकांमध्ये चर्चेत आहे. मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत असून, दुसऱ्या टप्प्यातील कारवाई कधी होणार? याकडे नागरिकांचे लक्ष खिळले आहे.”

