अजय कंडेवार,Wani:- चंद्रपूर येथील शेख हाजी खून प्रकरणातील फरार आरोपी सुरेंद्रकुमार रामपती यादव (३६) याला दर्शन कॉलनी, नंदनवन येथून अटक करण्यात आली. आरोपी येथे भाड्याने राहत होता. घटनेनंतर तो चंद्रपूरहून पळून नागपुरात आला.गुप्त माहितीच्या आधारे LCB ने कारवाई केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रपूरचा कोळसा -माफिया, शेख हाजी हा हॉटेलमध्ये गोळीबार होऊन जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. फरार आरोपी सुरेंद्रकुमार यादव याला नागपुरातून अटक केल्यानंतर त्याला चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सोमवारी शेख हाजी काही मित्रासोबत चंद्रपूरच्या शाही दरबार हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी गेला होता. यावेळी सशस्त्र आरोपींच्या टोळक्याने हॉटेलमध्ये घुसून त्याच्यावर हल्ला केला आणि गोळीबारही केला. सुमारे पाच गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी गंभीर जखमी हाजी शेखला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या हत्येचे वृत्त समजताच समर्थक आणि निकटवर्तीयांची गर्दी झाली. शेख
हाजीच्या मृत्यूनंतर रामनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी हत्येतील पाच आरोपींना अटक केली. जुन्या वैमनस्यातून विरोधकांनी त्याची हत्या केली. शेख हाजींचा चंद्रपुरात मोठा प्रभाव होता. शेख हाजीचे नागपुरातील अनेक गुन्हेगारांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला मध्यवर्ती कारागृहातही ठेवण्यात आले होते.