•उद्याचा मोर्चातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार
अजय कंडेवार,वणी :- मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी शेतकऱ्यांच्या सन्मानात मनसे मैदानात हा नारा देत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध धडक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. उद्या २० जानेवारीला शेतकरी, गोरगरीब व बेरोजगारांच्या न्याय हक्कांसाठी राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार असून अन्यायाचं वादळ झेलणाऱ्या सर्वांनीच या आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. शासकीय मैदानावरून उद्या सकाळी १० वाजता मनसेचा हा आर या पार मोर्चा निघणार आहे.
२०२२ ते आजपर्यंत १५००च्या वर शेतकऱ्यांना आत्महत्या केलेल्या आहेत. या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी अनेक अडचणींना तोंड दिले, पण सरकारने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारसोबत आर-पारची लढाई लढण्याचा निर्धार मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केला.
शेतकऱ्यांच्या (Farmers) मागण्यांसाठी मनसे उद्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या वणी (Wani) येथे ‘आर-पार’चा मोर्चा काढला जाणार आहे. शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर मनसे (MNS) आक्रमक झालेली आहे. पीकविमा, शेतीला दिवसा वीज पुरवठा आदी मागण्यांकडे या मोर्चातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. वरिष्ठ पातळीवर शिंदे-फडणवीस सरकारसोबत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची जवळीक वाढत असताना यवतमाळ जिल्ह्यात प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर (Raju Umbarkar) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
विदर्भात हजारो शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. यात यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती सर्वाधिक भीषण आहे. त्यामुळेच सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उद्या वणी येथे ‘आर पार’ मोर्चा काढत असल्याचे उंबरकर यांनी सांगितले. या मोर्चात हजारो शेतकरी, बेरोजगार, विद्यार्थी वणीत रस्त्यावर उतरणार आहेत. सरकारला आमच्या मोर्चाची दखल घ्यावी लागेल आणि शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील. असे नाही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विदर्भभर खळ खट्याक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.