•शेकडो शेतकऱ्यांसह मनसेचा “रास्ता रोको”.
अजय कंडेवार,वणी:- परिसरातील मोठ्या कोळसा खदानी पैकी असलेल्या पैनगंगा , कोलगाव आणि मुंगोली येथिल खदानीतून दिवसाकाठी कोळशाच्या हजारों टनांची मालवाहतूक होत आहे. परंतू सदर कोळसा मालाची वाहतूक करणारे वाहने नियमबाह्य पद्धतीने चालत आहे. अनेक वाहनांची कालबाह्यता झालेली आहे तर अपूर्ण साहित्याच्या आधारे हे वाहतूक करीत आहे. या मुळे रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. यामुळे या वाहतुकी दरम्यान या वाहनांतून कोळसा आणि कोळशाची धूळ रस्त्यावर आणि पिकांवर पडत आहे. पिकांचे मोठया प्रमाणत नुकसान झाले आहे. या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी .यासाठी येथील शेतकरी आक्रमक झाले आहे. तर या वाहतुकीचा रस्ता अडवून वे.को.लि विरोधात आक्रमक झाले आहे. आज सकाळपासून हा रस्ता रोको चालू असल्याने कोळसा वाहतूक करणारे शेकडो वाहने याठिकाणी अडविण्यात आले आहे. यामुळे इतर वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला आहे.
येनक, येनाडी, शिवणी, कोलगाव, शेवाळा यागावातून वेकोलीची कोळसा वाहतूक होत आहे. दरम्यान या गावातून होणाऱ्या वाहतुकीमुळे रस्त्यांची पूर्णतः चाळन झालेली आहे. त्याचबरोबर शेतामध्ये उभी असलेली कापूस, तूर व अन्य पिकांवर परिणाम होत असुन हे पिके पूर्णतः काळी पडली आहे. तर अनेक रोग पिकांवर येतं आहे. यामुळे पिके पूर्णतः उध्वस्त झालेली आहे. उत्पन्नात मोठी घट झाली आहे. कोळसा वाहतुकीतून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना अनेक आजारांचा सुद्धा सामना करावा लागत आहे. या सर्व बाबींना घेऊन येथील रहिवाशी आणि शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व त्याचबरोबर वेकोलीच्या क्षेत्रिय महाप्रबंधकांशी वारंवार पत्र व्यवहार करून हया मागण्या लावून धरल्या होत्या. उपविभागीय अधिकारी व महसूल विभागाने वेकोलिशी तात्काळ पत्रव्यवहार करून आपली जबाबदारी झटकून दिली. पुढे ही मागणी वेकोलि कडे गेली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे शेतकऱ्यांना देण्यात आली. तर वारंवार केलेल्या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवत संबंधित विभागाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी अखेर आपला हा मुद्दा मनसेकडे मांडला. या कास्तकारांना तात्काळ प्रतिसाद देत मनसेने संबंधित विभागाशी संपर्क साधला त्यावर संबंधित विभागाकडून येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास भाग पाडले. व हे पंचनामे पुढील कारवाई साठी वेकोलि कडे पाठविण्यात आले. मात्र सदर घटनेला अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही या शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नाही.
ह्या मागण्यांवर तोडगा काढून शेतकऱ्यांच्या झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई आणि येथून जाणारा रस्ता पूर्ववत करुन द्यावा यासाठी येथील शेकडो शेतकऱ्यांनी आज मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात येनाडी – येणक फाट्यावर रास्ता रोको करुन कोळशाची वाहतूक अडविले m सकाळी ११.०० वाजता पासुन सुरू झालेल्या आंदोलना मुळे कोळसा वाहतूक करणाऱ्या शेकडो गाड्या रस्त्यावर उभ्या आहे. यातून हजारों टन कोळशाची वाहतूक थांबली आहे. तर लाखो रुपयांचे आथिर्क भुर्दंड वेकोलीला बसत आहे. वृत्त लिही पर्यंत वेकोलिच्या किंवा महसूल विभागाच्या कोणत्याही अधिकारी किंवा प्रतिनिधि कडून या आंदोलनास भेट न दिल्याने हे आंदोलन अजून आक्रमक आणि व्यापक होणारं असल्याची माहिती आंदोलकर्त्यांनी दिली आहे. या आंदोलनात नुकसानग्रस्त शेतकरी प्रमोद दातारकर, विट्ठल पानघाटे , मारोती मिलमिले, नरेश गोखरे, पांडुरंग मिलमिले, सुभाष वासाडे, गोपाळ मत्ते, पुंडलिक पंडीले, पुंडलिक बांदुरकर, रमेश देवळकर यांच्या सह मनसेचे रणजित बोंडे, धीरज पिदुरकर, साई ऊगे, गजानन ठाकरे, गजानन बुच्चे, प्रवीण मोहजे, सूरज पिदुरकर, सूरज काकडे, गौरव बोबडे, सूरज दातारकर, धीरज बगवा सहभागी झाले.
शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आक्रमक असते. येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे वेकोलि कडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हे नुकसान भरपाई मिळावी यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला तरी सुद्धा मदत ही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आता मनसे या शेतकऱ्यांच्या हितार्थ रस्त्यावर उतरून आज ही वाहतूक बंद पूर्णपणे केली आहे. जोवर हे नुकसान भरपाई मिळणार नाही तोवर हे आंदोलन चालूच ठेवू व यातून जो काही परिणाम होईल त्यासाठी वेकोली प्रशासन जबाबदार असेल.
– फाल्गुन गोहोकार,तालुकाध्यक्ष, मनसे