•युवासेनेने दिले निवेदन
अजय कंडेवार,वणी :- गेल्या वर्षभरापासून वणी, शिरपूर, मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत महावितरणच्या वीज तारा व लोखंडी खांब चोरीच्या घटना घडत आहेत. याबाबत विद्युत विभागामार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे व या चोरीच्या घटनेत आतापर्यंत 3 तरुणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परंतु योग्य ती कारवाई न झाल्याने वरील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली वणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
17 नोव्हेंबर रोजी मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसोडा संकुलात विजेची तार चोरताना तरुणाचा मृत्यू झाला होता. दोन महिन्यांपूर्वी अशाच घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. दारूच्या नशेत चोर चोरी करतात.चोरीचा माल भंगार मालकांना विकला जात आहे. तसेच दारूच्या नशेत चोरी करताना हे चोरटे आपला जीव गमावत आहेत. तसेच विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा बंद होत असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. अशा स्थितीत या घटनांचा गांभीर्याने तपास न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.