Ajay Kandewar,Wani:- रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली, वाहनांची रांग लागली किंवा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई झाली की सर्वप्रथम बोट वाहतूक शाखेकडेच उचलले जाते. तक्रारी, निवेदने आणि आरोप हे या विभागाच्या वाट्याला नेहमीच येतात. मात्र या टीकेच्या गर्दीत वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करतात, याकडे समाजानेही एकदा गंभीरपणे पाहण्याची गरज आहे.
वाहतूक शाखेचे कर्मचारी केवळ चौकात उभे राहून वाहतूक नियंत्रित करत नाहीत, तर मंत्री, खासदार, आमदार, विविध शासकीय कार्यक्रम, मिरवणुका, सण-उत्सव, आपत्कालीन परिस्थिती आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या अनेक जबाबदाऱ्या ते पार पाडत असतात. कडक उन्हाळा, मुसळधार पाऊस किंवा थंडी अशा कोणत्याही वातावरणात त्यांची ड्युटी सुरूच असते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ते रस्त्यावर तासन्तास उभे राहून आपले कर्तव्य बजावत असतात.वणीसारख्या शहरात वाढती वाहने, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि अरुंद रस्ते ही मोठी समस्या आहे. अनेक वाहनचालक नियम मोडून रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. वाहतूक शाखा कारवाई करते, दंडही आकारते; मात्र काही वेळातच दुसरे वाहन त्याच ठिकाणी येऊन उभे राहते. त्यामुळे वाहतूक नियंत्रणाचे काम म्हणजे जणू सतत लालपुलिया परिसरात असो बाजारपेठेत असो “झाडू मारण्यासारखे” आहे.”कचरा” साफ झाला की पुन्हा नवीन “कचरा ” तयार होतो. ही परिस्थिती केवळ कारवाईने बदलत नाही; त्यासाठी नागरिकांची शिस्त आणि सहकार्यही तितकेच आवश्यक असते.
वाहतूक कोंडी ही फक्त पोलीस विभागाची जबाबदारी नसून ती प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक या तिन्ही घटकांच्या संयुक्त प्रयत्नातूनच सुटू शकते. पुरेशी पार्किंग व्यवस्था, वाहतूक नियमांचे पालन आणि जबाबदार वाहनचालक ही काळाची गरज आहे.वाहतूक शाखेच्या कामाचे खरे मूल्यमापन करायचे असेल, तर एखाद्या पावसाळी दिवशी किंवा भर उन्हात चौकात उभ्या असलेल्या त्या पोलीस कर्मचाऱ्याकडे एकदा पाहा. त्यांचे काम, त्याग आणि संयम लक्षात घेतल्यास टीकेसोबत कौतुकाचे दोन शब्दही नक्कीच त्यांच्या वाट्याला यायला हवेत. समाजाच्या सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी ते करत असलेले कार्यही तितक्याच प्रामाणिकपणे पाहिले जाणे आवश्यक आहे आणि अपघातांचे खरे कारण शोधायचे असेल, तर आरसा वाहतूक शाखेलाही दाखवा आणि स्वतःलाही.
टिप:- या बातमीत यंत्रणेची सकारात्मक अथवा नकारात्मक बाजू मांडण्याचा हेतू नसून, उपलब्ध तथ्यांच्या आधारे वस्तुस्थिती स्पष्टपणे भ्रामक झालेल्या जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सत्य, तथ्य आणि जनहिताला प्राधान्य देणे हा मूलभूत अधिकार व कर्तव्य आहे.

