विधानसभा,वणी :- प्रचाराला अवघे चारच दिवस शिल्लक असल्याने अंदाज येत असलेल्या उमेदवारांनी आता रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. ‘मायनस” असलेल्या गावांमध्ये ‘प्लस” होण्यासाठी गावपातळीवरील कार्यकर्त्यांकडून मतदारांना आपलेसे करण्यासाठी विनवणी केली जात आहे. सध्या प्रचाराची भिस्त गावपातळीवरील कार्यकर्त्यांवरच आहे.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी काहींनी आपल्या मतदारसंघात संपर्कावर भर दिला होता. ऐन विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काहींना उमेदवारी मिळाली. त्यानंतर उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली आहे.
काहींची प्रचाराची एक तर काहींच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये कोपरा सभा, बैठका, पदयात्रेच्या माध्यमातून गावपातळीवरील परिस्थिती काही प्रमाणात उमेदवार व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या लक्षात येत आहे. त्यातून कोणत्या गावांमध्ये आपण प्लस आहोत किंवा कोणत्या गावात आपण मायनस आहोत, याचा अंदाज आता उमेदवार व पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना येत आहे.त्यामुळे ज्या गावात आपण मायनस आहोत, विरोधी उमेदवाराला मताधिक्क्य मिळू शकते, अशा गावांत आपण प्लसमध्ये राहण्यासाठी किंवा विरोधी उमेदवाराचे मताधिक्क्य कमी करण्यासाठी आता भर दिला जात आहे.