•विविध शैली सत्यपाल महाराजांचा कीर्तनातून दिसणार.
अजय कंडेवार,वणी:- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त सुप्रसिद्ध समाज सुधारक महाराष्ट्र भूषण सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणीचा प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम 9 जानेवारी 2024 रोजी मंगळवार ला संध्याकाळी सात वाजता वणी शहरातील जैन लेआऊट येथील माऊली मंदिर परिसरात आयोजित केला आहे.
सत्यपाल महाराज यांची विशेष माहिती…..
“महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार. पूर्ण नाव सत्यपाल विश्वनाथ चिंचोलीकर. संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या प्रभृतिंनी गाव खेड्यातील मानवी समूहाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी दिलेला मूलमंत्र सत्यपाल महाराज हे आपल्या कीर्तनातून देत असतात. खंजेरी हे छोटे चर्मवाद्य ते त्यांच्या सादरीकरणावेळी वापरतात. एकाचवेळी सात खंजेऱ्या वाजविणे हे त्यांचे विशेष आहे.विदर्भातील जनमानसावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या कीर्तन जागराचा खूप मोठा प्रभाव आहे.
जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, निर्मल ग्राम, शिक्षण या अशा अनेक ग्रामीण माणसाला भिडणाऱ्या समस्यावर ते भाष्य करतात. त्यांची शैली ही लोकशैली असून त्याला नर्मविनोदाची,उपरोध उपहासाची जोड असते.संत गाडगे बाबा यांची कीर्तनशैली ही श्रोतुसंवादाची शैली होती. कीर्तन ऐकायला आलेल्या श्रोत्याला थेट प्रश्न विचारणे, उत्तराबद्दल त्याला शाबासकी देणे किंवा प्रसंगी त्याला अंतर्मुख करणे अशाच श्रोतुसंवादी शैलीतून सत्यपाल महाराज कॉमेडी प्रबोधनात्मक कीर्तन सादर करतात. शेतमजूर, शेतकरी, गावातील अठरापगड जातीजमातीतील लोक, अल्पशिक्षित लोक, ग्रामीण स्त्रिया या सर्व घटकांचे अनुभवविश्व फार त्रोटक असण्याची शक्यता असते. प्रबोधनाची तत्त्वजड भाषा त्यांना कळेलच असे होत नाही. नेमकी ही बाब लक्षात घेवून सत्यपाल महाराज अगदी ग्रामीण अनुभवविश्वाला भिडेल अशी भाषा आणि निवेदन शैली त्यांच्या कीर्तनात वापरतात.
१४,००० पेक्षा जास्त गावात जाऊन सत्यपाल महाराजांनी प्रबोधन केले असून त्यासाठी त्यांनी सुमारे ३० लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे.सदर कार्यक्रम ऐकण्यासठी उपस्थित राहण्याचे आवाहन जैन लेआऊट माऊली परिवाराचे वतीने करण्यात आले
विविध पुरस्कारांचे मानकरी सत्यपाल महाराज..
“ग्रामप्रबोधनात लक्षणीय योगदान दिल्यामुळे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून त्यांना अनेकदा विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार, समाज प्रबोधनकार पुरस्कार, मराठा विश्वभूषण पुरस्कार, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार, आम्ही सारे फाउंडेशन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. पुणे येथे आयोजित अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे (२०११) अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.”