Ajay kandewar,Wani : तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या आरक्षणाची घोषणा होताच वणी विधानसभेतील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. कोणाचा प्रभाग गेला, कोणाचे आरक्षण उलटले, कोणाला ‘महिला’ कोट्यातून फायदा मिळाला .यावरून प्रत्येक पक्षात असंतोषाची स्फोटक लाट उठली आहे.राजकीय अंगणात “कुठे खुशी, कुठे गम” अशी स्थिती निर्माण झाली आहे. काहींच्या चेहऱ्यावर आनंद, तर अनेकांच्या घरात निराशेचे सावट आणि बाशिंगचे समीकरण तुटल्याची चर्चा आता प्रत्येक चौकात जोरात रंगली आहे.
या आरक्षणात महिला कोट्याला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य मिळाल्याने अनेक अनुभवी पुरुष नेत्यांचे राजकीय गणित कोलमडले आहे. ‘या वेळी नाही तर पुढच्या पाच वर्षांनंतर बघू’ अशी भावना अनेकांनी मनाशी धरली असून, काहींची तर “घराबाहेर निघेना” अशी स्थिती झाल्याचे बोलले जात आहे.शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांमध्ये आता ‘जमणाऱ्यांचा आनंद’ आणि ‘तुटलेल्यांची खंत’ याचा संघर्ष दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी बाशिंग तुटल्याने नाराजीचा सूर वाढला असून काही ठिकाणी पक्षांतर्गत गटबाजीचा सूरही उमटतोय.
या आरक्षणामुळे अनेक नवीन चेहरे पुढे येणार हे निश्चित आहे. विशेषतः महिलांना मिळालेल्या प्रचंड संधीमुळे “वणी विधानसभेत महिला नेतृत्वाचे युग” सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.याचवेळी,आरक्षणामुळे झटका बसलेले काही जुने नेते आगामी काळात बंडखोरीचा मार्ग पत्करतील का? हा प्रश्नच.आरक्षणाने वणी तालुक्यातील राजकारणाचे तापमान वाढवले आहे. काहींना सोन्याची संधी, तर काहींना पाच वर्षांची प्रतीक्षा आणि याच वादळातून येणाऱ्या निवडणुकीचा खरा खेळ उलगडणार आहे.

