•शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील साहित्याकडे पाठ फिरवली…
सुरेंद्र इखारे,वणी– श्रावण महिना हा सणांची उधळण करणारा महिना आहे. यामध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणाच्या सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो आज हा सण वणीच्या शासकीय मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
यंदा श्रावणाच्या सुरुवाती पासूनच वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे . शेतकऱ्याच्या हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील साहित्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आपल्या सर्जा राजाच्या सजावटीसाठी देखील यंदा शेतकऱ्यांना हात आखडता घ्यावा लागला असल्याचे चित्र दिसून आले आहे. हा दिवस बैलांप्रति कृतज्ञ व्यक्त करणारा पोळा सण आहे . कारण बळीराजा आपल्या सोबत शेतात राबून घाम गळणाऱ्या बैलांसाठी एक दिवस उपवास करून त्या बैलाची सजावट करून त्याला गोडधोड खाऊ घालून त्याची पूजा करतो. आणि त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याच्या कामा प्रति कृतज्ञता व्यक्त करतो .
शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण सर्वात मोठा सण आहे. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. तरीपण शेतकऱ्यांनी पोळा सण उत्साहात साजरा केला आहे. यावेळी विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, हे उपस्थित होते यांच्या उपस्थितीत गण, पोवाडा, व झडत्या देण्यात आल्या त्यामुळे या उत्सवाला रंगत आली . व बळीराजा सुखी राहिला पाहिजे यासाठी सर्वांनी सहयोगाची भावना ठेवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.