Ajay,Wani : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक पात्र महिलांना अचानक बंद झाल्याने महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वणी तालुका काँग्रेस कमिटीने महिलांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत थेट प्रशासनाकडे धाव घेतली आहे. वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकेश पानघाटे यांनी महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून लाभ बंद झालेल्या महिलांची यादी जोडली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर-वणी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर तसेच माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुढाकार विकेश पानघाटे घेण्यात आला आहे.
निवेदनात जोडलेल्या प्रत्येक महिलेचा योजनेचा लाभ नेमका कोणत्या कारणामुळे बंद झाला, याची संबंधित अभिलेख तपासून स्वतंत्र चौकशी करावी आणि त्याबाबत स्पष्ट कारणांसह लेखी अभिप्राय (Remark) द्यावा, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित महिलांना पुन्हा योजनेचा लाभ सुरू करण्यासाठी कोणती कागदपत्रे अथवा पूर्तता आवश्यक आहे, याचीही स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र महिलांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, तर प्रशासनानेच त्यांच्या अडचणींचे निराकरण करावे, अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. आता प्रशासन या मागणीची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि लाभापासून वंचित महिलांना पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी कोणती कार्यवाही करते, याकडे वणी तालुक्यातील महिलांचे लक्ष लागले आहे.

