•मागण्या पूर्ण करून न्याय मिळावा.
अजय कंडेवार,वणी :- रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करुन रस्ता नागरिकांचे सुलभ वाहतुकीसाठी तयार करावा यासाठी व इतर मागण्यांसाठी ढाकोरी येथील बसस्थानकाजवळ ता.26 ऑक्टो.2023 पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून या उपोषणाला ढाकोरी येथील नागरिक उपोषणास बसले असुन यानंतर इतर गावचे सरपंच व नागरिक सहभागी झालेत.विविध मागण्या पूर्ण करून जनतेला न्याय मिळावा याकरिता माजी आमदार वामनराव कासावार यांचा मार्गदर्शनात वणी तालुका काँग्रेसच्या वतीने उपोषण मंडपाला भेट देत वणी तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे यांच्या नेतृत्त्वात सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन करीत जाहीर पाठिंबा दर्शविला. यावेळी झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे, ऍड.रुपेश ठाकरे, राजू झाडे, लकी सोनडुले, विजय झाडे व परिसरातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. व त्यानंतर लगेचच विशेष माजी आमदार वामन कासावार व अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष अफसर शेख यांनीही उपोषणकर्ते यांना भेट दिली.
तालुक्यातील वणी ते कोरपना मार्गावर कोळसा व सिमेंटच्या अनेक ट्रकमधून ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने वेळाबाई फाटा ते बोरी दरम्यान रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून मोठ्या प्रमाणात धूळ पसरत आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे असून धुळीमुळे रस्त्यावर नागरिकांना जाणे येणे खूप कठीण झाले आहे. या रस्त्यावर अनेक नागरिकांचे अपघात झाले आहेत.
रस्ता दुरुस्तीच्या मागणीशिवाय धुळीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी.या रस्त्यावर नियमितपणे पाणी मारण्यात यावे. मोहदा येथील गीट्टी क्रेशर व इतर ओव्हरलोड वाहतूक बंद करावी, धुळीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम झालेल्या शेतमजुराच्या आरोग्याची तपासणी करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या.