Ajay,Wani : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर शिक्षणात सातत्याने यश मिळवणाऱ्या राजुर येथील युतिका कोंकटवार हिने सुशगंगा महाविद्यालयातून बीबीए प्रथम वर्षात उल्लेखनीय क्रमांक पटकावत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. यापूर्वी तिने दहावीतही उल्लेखनीय यश मिळवले होते, तर तिची मोठी बहीण हिने दहावी व बारावीमध्ये अव्वल यश संपादन केले आहे. मजूर कुटुंबातील या दोन्ही बहिणींच्या यशामुळे संपूर्ण राजुर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
युतिका कोंकटवारच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार संजय देरकर व किरणताई देरकर यांच्या हस्ते तसेच राजुरच्या सरपंच विद्याताई पेरकावार आणि गावातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते युतिका समय्या कोंकटवार व त्यांच्या आई-वडिलांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या पालकांच्या जिद्दीचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. शिक्षणाच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते, असा प्रेरणादायी संदेश या कुटुंबाने समाजासमोर ठेवला.
या सत्कार सोहळ्यासाठी पुढाकार घेत फैजल बशीर खान यांनी आमदार संजय देरकर यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवून कार्यक्रमाचे नियोजन केले. राजुर गावातील विविध नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने कार्य केल्याबद्दल आमदार संजय देरकर यांनी फैजल बशीर खान यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक, मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित गावातील ज्येष्ठ नेतेअशोक वानखेडे, विलासजी देवतळे,माजी ग्रा.पं सदस्य डेव्हिड पेरकावार, भाजप पदाधिकारी अनिल डवरे व अन्य गावकरी उपस्थित होते.

