Ajay Kandewar,Wani:- पोलीस अधीक्षक, यवतमाळ कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “ऑपरेशन प्रस्थान” उपक्रमांतर्गत वणी शहरात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी दोन दिवसीय स्वसंरक्षण, कौशल्यविकास व सक्षमीकरण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पोलीस स्टेशन वणी (जि. यवतमाळ) यांच्या वतीने दि. ०३ व ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी शेतकरी भवन, वणी येथे हा उपक्रम पार पडला. वणी शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील एकूण सुमारे ६५० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
लोकमान्य टिळक महाविद्यालय, शिक्षक प्रसारक मंडळ, जनता विद्यालय, विवेकानंद विद्यालय, स्वर्णलिला इंग्लिश मिडीयम स्कूल, मायक्रोन इंग्लिश मिडीयम स्कूल, ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल तसेच आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शालेय मुलींचे आत्मसंरक्षण, कौशल्यविकास व सक्षमीकरण हा होता. दि. ०३/०२/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते थोर पुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सखोल मार्गदर्शन केले. कराटे प्रशिक्षक आनंद भुसारी यांनी मुलींना प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे स्वसंरक्षणाचे धडे दिले. वाहतूक नियमन व रस्ता सुरक्षा या विषयावर पोलीस निरीक्षक देवकते (जिल्हा वाहतूक शाखा, यवतमाळ) व सहा. पोलीस निरीक्षक विजय महाले (वाहतूक शाखा, वणी) यांनी नियमांची माहिती देत सुरक्षिततेचे महत्त्व पटवून दिले. सायबर सुरक्षा विषयावर सपोनि प्रकाश तायडे यांनी डिजिटल अरेस्ट, माफिंग, फिशिंग तसेच फेसबुक-इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या सुरक्षित वापराविषयी विद्यार्थ्यांना सजग केले.
तसेच ड्रग व नशेविरोधी जनजागृती, नागरी शिस्त व महिला संबंधी कायदे या विषयांवर पोलीस निरीक्षक यशोधग मुनेश्वर, सपोनि शुभांगी गुल्हाणे (पोलीस अधीक्षक कार्यालय, यवतमाळ) यांनी समाजातील वास्तव घटनांच्या आधारे मार्गदर्शन करून मुला-मुलींना होणाऱ्या चुकांपासून दूर राहण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. आरोग्य व प्राथमिक उपचार विषयावर डॉ. आवारी सर (वणी ग्रामीण रुग्णालय) यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी वणी ठाणेदार P.I गोपाल उंबरकर उपस्थित होते.

