Ajay Kandewar, वणी : तालुक्यातील मोहदा येथे बेकायदेशीर मुरूम वाहतुकीमुळे महसूल विभागाची झोप उडाली असताना, मोहदा गाव परिसरात एका धडाकेबाज तलाठ्याने आज मुरूम माफियांना अक्षरशः चपराक दिली. नियमांच्या पायावर डाका घालणाऱ्यांचा खेळ उघड करत तलाठी अमोल गाठे यांनी रंगेहात हायवा पकडून प्रशासनाचा सन्मान उंचावला आहे.

गट क्र. 45 जवळील मोहदा गावची शेवटची शिव व केशवनगर पहिली शिव परिसरात दिनांक 16 सप्टेंबर ला साडेबारा वाजताच्या सुमारास ही कारवाई झाली. MH 40 CT 7374 या हायव्यात तब्बल दहा ब्रास मुरूम असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे.सदर ट्रक चालक शंकर दिवाकर कोयरे (वय 21, रा. अकोला) हा मुरूम घुगुसकडे घेऊन जात असताना तलाठी अमोल गाठे यांनी थेट कारवाई केली. चौकशीत उघडकीस आले की या ट्रकाची मुरूम रॉयल्टी दिनांक 15 मध्यरात्रीच संपलेली असूनही वाहतूक सुरूच होती. महसूल विभागाने विशेष “महासेतू ॲप” मधून रॉयल्टी तपासणी केली असता, ही बाब स्पष्ट झाली.दरम्यान, ट्रक मालकाचे नाव सांगण्यास चालकाने टाळाटाळ केली. त्यामुळे पंचनामा करून वाहन तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे. मंडळ अधिकारी नितिन बांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून पंचनाम्यात स्थानिक पंच व साक्षीदार उपस्थित होते.
आता या प्रकरणी तहसील प्रशासनाकडून पुढे कोणती दंडात्मक कारवाई केली जाणार, किती दंड आकारला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महसूल विभागाच्या या धडाकेबाज हालचालीमुळे परिसरातील बेकायदेशीर मुरूम माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

