Ajay Kandewar,Wani:- नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 अ व ब मध्ये शिवसेना (उबाठा) चे उमेदवार शत्रुघ्न मारोती मालेकर आणि सौ. किरण शंकर देरकर तसेच महाविकास आघाडीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. संचिता विजय नगराळे यांच्या प्रचाराला वेग आला असून संपूर्ण प्रभागात या उमेदवारांचा जोरदार जनसंपर्क सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 23 नोव्हेंबर रोजी प्रभाग 9 मध्ये शिवसेना उबाठा गटाच्या पुढाकाराने महाविकास आघाडीची भव्य आणि अभूतपूर्व रॅली काढण्यात आली.
रॅलीची सुरुवात जैन ले-आऊट येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन झाली. यानंतर रॅलीने गेडाम ले-आऊट, देरकर ले-आऊट, साने गुरुजी ले-आऊट आणि पंचशील नगर मार्गे पुढे जात उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार शत्रुघ्न मालेकर, किरण शंकर देरकर तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. संचिता नगराळे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. रॅलीत शेकडोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शिवसेना उबाठा गटाचे आमदार संजय देरकर, मनसेचे राजू उंबरकर, इरशाद खान, संतोष कुचनकर, काँग्रेसचे टीकाराम कोंगरे, माजी नगराध्यक्ष साधना गोहोकर, संजय निखाडे व गणपत लेडांगे यांच्यासह विविध पक्षांचे मान्यवर एकत्र दिसले. प्रभाग 9 मधील ही ऐतिहासिक रॅली स्थानिक राजकारणात महाविकास आघाडीच्या शक्तिप्रदर्शनाचा ठसा उमटवत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

