अजय कंडेवार,Wani:- सद्गगुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन मे. बी.एस. इस्पात लि. या कोळसाखानी करीता परस्पर विक्री केल्याचा बंडू देवाळकर या व्यक्तीने पत्रकार परिषदेतून केलेला आरोप धादांत खोटा असून एखाद्याच्या स्वच्छ प्रतिमेला दागदाळ करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. यामागे राजकीय षडयंत्र असून त्याचा बोलविता धनी कुणी तरी वेगळाच आहे. राजकीय कुरघोडीतुन अशा प्रकरे लांछन लावण्याचे कुटील प्रयत्न सुरु झाले आहेत.असा घणाघाती आरोप करीत लावलेल्या आरोपाचे खंडण करण्यात आले.
जगन्नाथ महाराज संस्थानच्या नावाने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेली ही शेत जमीन त्यांची रीतसर परवानगी घेऊनच विक्री करण्यात आली आहे. तसेच जगन्नाथ महाराज देवस्थान समितीचा ठराव घेऊन व ठरव बुकात नोंदणी करून हा व्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे जगन्नाथ महाराज संस्थानच्या नावे असलेली शेत जमीन आर्थिक हव्यासापोटी परस्पर विक्री केल्याचा हेतुपुरस्सरपणे करण्यात आलेला आरोप बिनबुडाचा असल्याचे स्पष्टीकरण संस्थानचे विश्वस्त संजय देरकर यांनी पत्रकार परिषदेतून दिले.
जगन्नाथ महाराज संस्थानची जमीन बी,एस. इस्पात लि. या कंपनीला परस्पर विकून संजय देरकर यांनी आपला आर्थिक फायदा करून घेतल्याचा तथ्यहीन आरोप बंडू देवाळकर या व्यक्तीने पत्रकार परिषद घेऊन केला. त्यावर स्पष्टीकरण देण्याकरिता संजय देरकर यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन या आरोपाचे पूर्णपणे खंडन केले आहे.
काय आहे प्रकरण…..
झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावे रजिस्टर असलेली ही पाच एकर शेत जमीन सन १९७४ साली रामलू उर्फ रामन्ना बकन्नाजी मंदावार यांनी वणी रजिस्टर कार्यालयात बक्षिस पत्राद्वारे संस्थानला दान दिली. त्यानंतर १९८६ साली संस्थानच्या वतीने धर्मदाय आयुक्ताकडे या शेत जमिनीची नोंदणी करण्यात आली. १९८६ पासून जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावे ही शेत जमीन रजिस्टर असून तशी सातबाऱ्यावर नोंद देखील आहे. दरम्यान मे. बी. एस. इस्पात लि. या कंपनीने कोळसाखानी करीता येथील शेत जमिनी अधिग्रहित केल्या. मात्र सर्वे नंबर ४९/५ मधील २.२ हेक्टर असलेली ही शेत जमीन जगन्नाथ महाराज संस्थानच्या नावे रजिस्टर असल्याने ती अधिग्रहित होणे बाकी होते. त्यामुळे कोळसा कंपनी वारंवार या शेत जमिनी बाबत पाठपुरावा करीत होती. त्याकरिता २५ जानेवारी २०२४ रोजी धर्मदाय आयुक्त अमरावती यांच्याकडे या शेत जमिनीच्या विक्री बाबत परवानगी मिळण्याकरिता देवस्थान समिती कडून अर्ज सादर करण्यात आला. त्यानुसार १९ सप्टेंबर २०२४ रोजी शेत जमीन विक्री करण्याकरिता धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी मिळाली. ही सर्व प्रक्रिया नियमानुसार करण्यात आली. शेत जमीन खरेदी विक्रीचे सर्व व्यवहारही पारदर्शकपणे झाले आहेत. जगन्नाथ महाराज संस्थानच्या खात्यातच ही सर्व रक्कम जमा होणार आहे. त्यातून दुसरीकडे शेत जमीन घेऊन सद्गुरू जगन्नाथ महाराज यांचं देवस्थान बांधण्यात येणार आहे. मंदावार यांनी दान केलेल्या शेत जमिनीचे ट्रस्टी म्हणून मंदावार कुटुंबातील सदस्यच जबादारी पार पाडत होते. त्यामुळे जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावे रजिस्टर असलेली शेत जमीन परस्पर विक्री केल्याचा माझ्यावर करण्यात आलेला आरोप धादांत खोटा असल्याचे स्पष्टीकरण संजय देरकर यांनी पत्रकार परिषदेतून दिले आहे.