•कर्मचाऱ्यांची वानवा,शिवसेनेने घेतली झाडाझडती.
अजय कंडेवार,वणी:- डेंग्यू सदृश तापाच्या विळख्यात तालुका सापडला आहे असे असतानाही वणी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य सुद्धा बिघडले आहे तसेच ग्रामीण रूग्णालयात अनागोंदी कारभार सुरु असल्याचे शिवसैनिकांना कळताच बुधवार, दि.12 ऑक्टोबर रोजी शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे व शहर प्रमुख सुधीर थेरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेणे सुरू केले. वणी ग्रामीण रुग्णालयात भेट देवुन पाहणी केली असता औषधींचा तुटवडा, ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व विस्कटलेली प्रशासन व्यवस्था या ग्रामीण रुग्णालयातील सेवाच सलाईनवरच असल्याची भावना रुग्णांमध्ये निर्माण होत आहे.
ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर केवळ धूळ खात आहे. शासनाचे करोडो रुपये पाण्यात गेल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. ग्रामीण रुग्णालयात एकूण मंजूर पदे 29 असताना फक्त 17 पदे भरण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे डॉक्टरांची 4 पदे रिक्त आहे. ऑपरेशन थिएटर ची गरज आहे. लॅबोरेटरी असिस्टंट हे पद अद्याप भरलेले नाही, ऑर्थो व अनथेसिस्ट डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नाहीत.ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कार्यान्वित नाही. ओपीडी मध्ये रुग्णांची धातुरमातुर तपासणी केल्या जाते. गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार न करता रुग्णाला दुसरीकडे हलविण्यात येते. सध्यस्थीतीत सर्वत्र व्हायरल आजाराने धुमाकूळ घातला आहे. असं असताना ग्रामीण रुग्णालयात रुग्णासाठी योग्य सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.उपविभागातील औद्योगिकीकरण व होत असलेले प्रदूषण यामुळे विविध आजाराने थैमान घातले आहे. स्थानिक नागरिकांना अनेक आरोग्यविषयक समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यातच खनिज संपत्तीचे बेजबाबदारपणे अवजड वाहनातून होणारे दळणवळण अपघाताला कारणीभूत ठरताहेत. यामुळे ग्रामीण रुग्णालयाची संपूर्ण प्रणाली अपुरी पडताना दिसत आहे.
लोकप्रतिनिधीचा उदासिनतेमुळे दुरवस्था..…
“वणी ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव आहे.एकूण मंजूर पदे 29 असताना फक्त 17 पदे भरण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे डॉक्टरांची 4 पदे रिक्त आहे. ऑपरेशन थिएटर ची गरज आहे. लॅबोरेटरी असिस्टंट हे पद अद्याप भरलेले नाही, ऑर्थो व अनथेसिस्ट डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नाहीत.औषधसाठा, रुग्णालय, शवविच्छेदनगृहाची दुरवस्था, म्हणून रुग्णांचे हाल होत असताना या विभागाचे आमदार, तसेच पालकमंत्र्यांचे याकडे लक्ष नसणे हे जनतेचे दुर्भाग्य असून, रुग्णालयाच्या कारभारावर कोणाचाच अंकुश नसल्याने नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधेला मुकावे लागत आहे.”- शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे
रुग्णालयातील रुग्णाची होत असलेली कुचंबणा शासनाने तात्काळ थांबवावी अन्यथा जनहीतार्थ तीव्र शिवसेना आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी उपशहर प्रमुख प्रशांत बलकी, अजय चन्ने, अजिंक्य शेंडे, स्वप्नील ताजने, धर्मा काकडे व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.