Ajay Kandewar,Wani: वणी नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट कौल दिल्यानंतर, आता सत्तास्थापनेचा पुढचा निर्णायक टप्पा गाठला गेला आहे. नगराध्यक्षपद आधीच भाजपकडे गेले असून, स्वीकृत सदस्यांपैकी तीनपैकी दोन आज निश्चित होणार आहे. मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ते उपाध्यक्षपदासाठी सुरू असलेले अंतर्गत लॉबिंग.आज होणाऱ्या उपाध्यक्ष निवडीमध्ये कुणबी समाजाचा चेहरा असणार का? याकडे संपूर्ण शहरासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
•लक्ष्मण उरकुडे …..
अनुभव, विश्वास आणि सामाजिक अधिष्ठान स्वभावाने मृदू, वृत्तीने मदतकारी आणि समाजाशी घट्ट नातं हीच लक्ष्मण उरकुडे यांची खरी ओळख. सामाजिक कार्य असो, वैद्यकीय मदत असो किंवा प्रशासकीय पातळीवरील प्रश्न – उरकुडे यांचा अधिकारी वर्गापर्यंत असलेला दांडगा संपर्क आणि विश्वासार्ह प्रतिमा त्यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.याच विश्वासाच्या बळावर आज कुणबी समाजाचा एक सक्षम, सकारात्मक आणि अभ्यासू चेहरा नगरपरिषदेत पुढे येताना दिसत आहे. प्रशासनाशी समन्वय साधण्याची क्षमता, संघर्ष न वाढवता प्रश्न मार्गी लावण्याची शैली आणि समाजाच्या सर्व घटकांमध्ये स्वीकारार्हता या सर्व बाबी उपाध्यक्षपदासाठी उरकुडे यांचे वजन वाढवताना दिसत आहेत.
•राकेश बुग्गेवार ….
दुसरीकडे, प्रभाग क्रमांक ४ मधून दुसऱ्यांदा निवडून आलेले राकेश बुग्गेवार हे नाव सध्या युवकांमध्ये विशेष चर्चेत आहे. मजबूत जनसंपर्क, तरुणांशी असलेले घट्ट नाते आणि सक्रिय राजकीय उपस्थितीमुळे बुग्गेवार यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नव्या पिढीच्या अपेक्षा, प्रश्न आणि आकांक्षा सभागृहात मांडण्याची ताकद त्यांच्याकडे आहे, हे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.वरिष्ठ ओबीसी नेतृत्वाला संधी की युवा नेतृत्वाला संधी?आजचा प्रश्न फक्त उपाध्यक्षपदापुरता मर्यादित नाही. अनुभव आणि सामाजिक स्थैर्याला प्राधान्य दिले जाणार का?युवकांच्या ऊर्जेला आणि भविष्यातील नेतृत्वाला?भाजप नेतृत्व नेमका कोणता संदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कुणबी समाजासाठीही ही निवड अत्यंत संवेदनशील मानली जात असून, पुढील नगरपरिषद राजकारणाची दिशा ठरवणारी ठरू शकते.

