अजय, वणी : वणी तालुक्यातील राजूर येथे दोन-दोन सीनियर टेक्निशियन नियुक्त असतानाही वीज यंत्रणेचा कारभार मात्र वाऱ्यावर असल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून होत आहे. कामावर उपस्थित राहण्याची वेळ सकाळी ९ वाजताची असताना संबंधित टेक्निशियन दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत उपस्थित होत असल्याची तक्रार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशांनाही जुमानले जात नसल्याचा आरोप पुढे आला आहे. गावातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड आहे. वीज गेली की खासगी तांत्रिक कर्मचाऱ्यांना फोन करून बोलवायचे आणि परमिटसाठी त्यांच्यावर अवलंबून राहायचे, असा कारभार सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दोन वरिष्ठ तंत्रज्ञांची नियुक्ती असतानाही गावातील वीजपुरवठा तीन तास खंडित राहण्याची वेळ येत असेल, तर त्यांच्या कर्तव्यपालनाची तपासणी कोण करणार? वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाक उरला आहे की नाही? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
दुसरीकडे, खासगी तांत्रिक कर्मचारी शंकर आणि कंत्राटी हेल्पर रुपेश आत्राम यांच्याकडून मोठ्या कामासाठी विद्युत खांबावर चढणे व वीजवाहिनी जोडण्यासारखी धोकादायक कामे करून घेतली जात असल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही सीनियर टेक्निशियनच्या उपस्थिती नोंदी, कामकाज, परमिट प्रक्रिया, नागरिकांच्या तक्रारी आणि त्या दिवशीच्या कर्तव्यपालनाची तातडीने कार्यालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. जर चौकशीत कर्तव्यात कसूर किंवा नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास नियमानुसार निलंबित करावे; तसेच परिस्थितीनुसार राजूरमधून बदली करण्याची कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी नागरिकांतून पुढे येत आहे. ‘पगार सरकारी, पण जबाबदारीपासून पळापळ’ असा कारभार खपवून घेतला जाणार नाही, असा संताप व्यक्त होत असून, आता महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या कथित निष्काळजीपणाची दखल घेऊन कारवाई करतात की तक्रारींकडे दुर्लक्ष करतात, याकडे राजूरवासीयांचे लक्ष लागले आहे.

