Ajay Kandewar, वणी :कृषी उत्पन्न बाजार समिती वणी येथे घडलेल्या घटनेने शेतकऱ्यांच्या वेदनांवर प्रकाश टाकला. कष्टाने पिकवलेला, दर्जेदार कापूस असूनही तो नाकारण्यात आल्याने एका शेतकऱ्याची मानसिक अवस्था ढासळली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता, कर्जाचा बोजा आणि वारंवार होणारा अपमान यामुळे तो टोकाच्या निर्णयाच्या उंबरठ्यावर पोहोचला.
बाजार समितीत दाखल झाल्यानंतर प्रत्यक्षात चांगला असलेला कापूस ग्रेडिंगच्या नावाखाली नाकारला गेला. शेतकऱ्याच्या विनवण्या दुर्लक्षित करण्यात आल्या. या अन्यायाने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने क्षणिक आवेशात टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत फाल्गुन गोहोकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.यानंतर आक्रमक भूमिकेतून कापसाची फेरतपासणी करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, आधी नाकारलेला तोच कापूस तपासणीत ‘१ नंबर’ दर्जाचा ठरला. त्यामुळे बाजार समितीतील ग्रेडिंग प्रक्रिया आणि हेतू यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.“दर्जेदार माल नाकारून शेतकऱ्यांना मानसिक कोंडीत ढकलले जातेय. हा प्रकार कोणाच्या फायद्यासाठी?” असा थेट सवाल उपस्थित होत असून, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
शेतकरी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंतच तुमची खुर्ची शाबूत आहे. ज्या दिवशी त्याचा संयम सुटेल, त्या दिवशी व्यवस्था कोलमडायला वेळ लागणार नाही.”- फाल्गुन गोहोकार, तालुकाध्यक्ष,मनसे (वणी)

