Ajay Kandewar,Wani:- गोकुळनगर परिसरात आज अक्षरशः खळबळ उडाली असून, नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवशीच प्रभाग क्रमांक १४ मध्ये पैशांचा महापूर आल्याची जोरदार चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. मतदान सुरू असतानाच अचानक वाढलेली हालचाल, संशयास्पद भेटीगाठी आणि “नोटांचा खेळ सुरू आहे” अशा कुजबुजीमुळे परिसरात राजकीय वातावरण तापले आहे.
विशेष म्हणजे ही संपूर्ण चर्चा थेट भाजपशी जोडली जात असून, सत्तेचा गैरवापर करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा सवाल आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे. मतदानाच्या शेवटच्या तासांमध्येच अशी चर्चा उफाळून येणे, हे केवळ योगायोग मानायचे की नियोजित डावपेच—याबाबत मतदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
“विकासाचे गाजर दाखवणाऱ्या भाजपकडे शेवटी नोटाच उरल्या का?” असा खोचक सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. जर सर्व काही पारदर्शक असेल, तर मग पैशांच्या महापुराची चर्चा इतक्या जोरात का? आणि तीही मतदानाच्या अगदी शेवटच्या दिवशीच का? असे प्रश्न आता निवडणूक प्रक्रियेच्या स्वच्छतेवरच बोट ठेवत आहेत.या संपूर्ण प्रकारामुळे निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पैशांच्या जोरावर सत्ता खेचण्याचा प्रयत्न होत असेल, तर लोकशाहीचा गळा घोटला जात नाही ना? अशी भावना मतदारांमध्ये दाटून आली आहे.गोकुळनगरातील ही खळबळजनक चर्चा भाजपसाठी नक्कीच डोकेदुखी ठरणार असून, या “नोटांच्या राजकारणा”वर भाजप काय खुलासा करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

