Ajay Kandewar,Wani : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत चारगाव येथील शेतातील विद्युत डीपीवर काम करताना खाजगी कंत्राटी कर्मचारी विनोद महादेव कुळसंगे (३५), रा. निंबाळा यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. विनोद हा मंदर,चारगाव आणि केसुरली या गावांचा एरिया वाटप असलेला हेल्पर म्हणून काम करीत होता, अशी माहिती समोर येत आहे. त्याचे मुख्य काम वरिष्ठ लाईनमनला मदत करणे होते. खांबावर चढणे, थेट लाईन जोडणे किंवा डीपीवर धोकादायक स्वरूपाचे तांत्रिक काम करणे ही त्याची जबाबदारी होती का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
जर विनोद हेल्पर म्हणून काम करीत होता, तर त्याला डीपीवर नेमके कोणाच्या आदेशाने पाठविण्यात आले? त्या दिवशी ड्युटीवर कोणकोणते वरिष्ठ लाईनमन व तांत्रिक कर्मचारी होते? विनोद कोणत्या वरिष्ठ लाईनमनचा मदतगार म्हणून काम करीत होता? त्याला प्रत्यक्ष कामाचे आदेश कोणी दिले? डीपीवर काम सुरू करण्यापूर्वी वीजपुरवठा पूर्णपणे बंद असल्याची खात्री कोणी केली? या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. विनोदला त्याच्या नियुक्तीच्या कक्षेबाहेर धोकादायक काम करण्यास सांगण्यात आले असेल, तर त्या वेळी जबाबदार असलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांची भूमिका निश्चित होणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, विनोदला जर कोणीतरी वरिष्ठाने कामाचा आदेश दिला असेल, तर घटनेपूर्वी त्याच्या मोबाईलवर आलेले व त्याने केलेले कॉलही तपासाचा महत्त्वाचा भाग ठरू शकतात. तसेच त्या दिवशीची ड्युटी यादी, एरिया वाटप, कामाचे आदेश, संबंधित वरिष्ठ लाईनमनची उपस्थिती आणि घटनास्थळावरील परिस्थिती यांची पडताळणी झाली पाहिजे. विनोदला शॉक लागल्यानंतर वरिष्ठ तांत्रिक कर्मचारी नेमके कुठे होते आणि त्यानंतर घटनास्थळावरून कोणी निघून गेले का, याचाही तपास व्हावा. एका हेल्परचा जीव गेला आहे; त्यामुळे केवळ अपघाताची नोंद न करता, ‘विनोदला हे काम कोणी दिले?’ आणि ‘त्या वेळी त्याची जबाबदारी असलेला वरिष्ठ कर्मचारी कोण होता?’ या प्रश्नांची ठोस उत्तरे तपासातून समोर येणे गरजेचे आहे.

