Tuesday, February 17, 2026
HomeBreakingRTI ने उघडले पोलखोल ! वणीत ‘माजी नगराध्यक्ष’ पदाचा बनाव उघड

RTI ने उघडले पोलखोल ! वणीत ‘माजी नगराध्यक्ष’ पदाचा बनाव उघड

Ajay Kandewar, Wani : वणी नगर परिषदेशी संबंधित अधिकृत पदाचा कथित बेकायदेशीर वापर करून नागरिकांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप करत अर्जदार रविंद्र दामोधर येरणे यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. या प्रकरणात फसवणूक, चुकीचे प्रतिनिधित्व व प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, राकेश ओमप्रकाश खुराणा हे स्वतःचा उल्लेख “माजी नगराध्यक्ष, नगर परिषद वणी” असा करीत असून, हा उल्लेख खोट्या प्रसिद्धीसाठी वापरला जात आहे. प्रत्यक्षात त्यांनी कधीही वणी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद भूषविले नसल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीच्या पदाचा गैरवापर करून जनतेमध्ये चुकीची प्रतिमा निर्माण केली जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.अर्जात नमूद केल्यानुसार, सन २००६ ते २०११ या कालावधीत राकेश खुराणा हे वणी नगर परिषदेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तथापि, त्या कालावधीत ते कधीही अधिकृत नगराध्यक्ष नव्हते. यासंदर्भात माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत वणी नगर परिषदेकडून माहिती मागविण्यात आली होती. त्यावर कार्यालयीन पत्र क्रमांक नपव/सभा.वि/माअ/१९९/२०२५, दिनांक ०९-०६-२०२५ अन्वये प्राप्त माहितीतही त्यांच्या नगराध्यक्ष पदाची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हाच तो पदाचा गैरवापर प्रकार उघडकीस…☝️

मिळालेल्या माहितीप्रमाणे, दि. २५-०८-२०१० रोजीची विशेष सर्वसाधारण सभा व दि. २२-०९-२०१० रोजीची स्थायी समिती सभा या काळात तत्कालीन नगराध्यक्ष यादव गोविंद सातपूते गैरहजर असल्यामुळे, उपाध्यक्ष या नात्याने राकेश खुराणा यांनी फक्त प्रभारी (कार्यकारी) अध्यक्ष म्हणून सभेचे अध्यक्षस्थान भूषविले होते. मात्र, प्रभारी अध्यक्ष व अधिकृत नगराध्यक्ष या दोन पदांमध्ये कायदेशीर व प्रशासकीय दृष्ट्या मूलभूत फरक असूनही, त्याचा गैरअर्थ लावून “माजी नगराध्यक्ष” असा उल्लेख केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.वणी नगर परिषदेच्या अधिकृत अभिलेखांमध्ये नगराध्यक्ष म्हणून कोणतीही नोंद नसताना, असे पद वापरणे हे नागरिकांची दिशाभूल करणारे, प्रशासकीय नियमांना छेद देणारे व कायदेशीरदृष्ट्या आक्षेपार्ह असल्याचे अर्जदाराने नमूद केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, लोकशाही व्यवस्थेतील पदांची विश्वासार्हता धोक्यात येत असल्याचा मुद्दाही अधोरेखित करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, “माजी नगराध्यक्ष, नगर परिषद वणी” या पदाचा वापर तात्काळ प्रतिबंधित करावा, संबंधित व्यक्तीविरोधात योग्य ती दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारचे चुकीचे प्रतिनिधित्व होऊ नये यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी स्पष्ट मागणी अर्जदार रविंद्र दामोधर येरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments