अजय कंडेवार, वणी:- मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे यांचा जाहीर निषेध भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी केला आहे. मनोज जरांगे हे बेताल वक्तव्य करून चुकीच्या पध्द्तीने राज्य सरकारला वेठीस धरत आहेत. व आता तर त्यांनी पातळी सोडून राज्य सरकार मधील नेत्यांवर वैयक्तिक टीकाटिप्पणी करायला सुरुवात केलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगेनी वैयक्तिक व राजकीय स्वरूपाची स्तरहिन टीका केली आहे. असे करून जरांगे राज्यातील सामाजिक व राजकीय वातावरण खराब करीत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. अशोक जीवतोडे यांनी जरांगेचा पुन्हा जाहीर निषेध केला आहे व त्यांना अटक करण्याची मागणीही केलेली आहे.
मागे डिसेंबर महिन्यात आम्ही राज्यस्तरीय ओबीसी बचाव परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांचा जाहीर निषेध केलेला होता. जरांगे यांची वारंवार बदलणारी भूमिका व असंवैधानिक आंदोलन हे शांतताप्रिय महाराष्ट्र राज्यात अराजकता निर्माण करणारे आहे. त्यांचा बोलविता धनी आम्ही ओळखून आहोत. ओबीसी समाज जरांगे यांचा निषेधच करीत आला. अशातच परत जरांगेनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक व राजकीय स्वरूपाची स्तरहीन टीका केली. मनोज जरांगे यांची टीका तथ्यहीन व बेताल आहे. सतत फोकसमधे राहण्याकरिता ओबीसी नेते व राज्य सरकार मधील मोठ्या नेत्यांविरोधात चुकीचे वक्तव्य करून सामाजिक व राजकीय वातावरण खराब करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे करीत आहेत. त्यांच्या या टीकेचा व राजकीय भूमिकेचा ओबीसी समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. राज्य सरकारने मनोज जरांगे यांना अटक करावी. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागावी, अन्यथा ओबीसी समाज घेवून आम्ही रस्त्यावर उतरू असे भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले आहे.
नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र १०% आरक्षण देवू केले. मराठा समाजाला आरक्षण देताना राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागू दिला नाही. मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण मिळावे, याकरीता राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मराठा व ओबीसी समाजात सौहार्द रहावे, समाजा समाजात तेढ निर्माण होवू नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत आहे. मनोज जरांगे यांनी देखील आता सबुरीने घ्यावे. मात्र सतत आंदोलनाचे शस्त्र उचलून व मराठा समाजाच्या भावनेचा गैरवापर करून राज्याची सहिष्णुता जरांगे संपवित आहेत. अशातच वेळोवेळी ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील वैयक्तिक टीका आमच्या भावना दुखावणारी आहे. त्यामुळे जरांगेच्या त्या वक्तव्याचा निषेध करून जरांगेनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागावी, असे प्रतिपादन डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे.