Ajay Kandewar, Wani :-वणी शहरातील अवघ्या १ किमी अंतरावर असलेल्या विनायक नगर (Z.P कॉलनी) परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळाला अक्षरशः माती, काळं व दुर्गंधीयुक्त पाणी येत असून नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याच्या मार्गावर आहे. सुरुवातीला नळ सुरू केला की पाण्याऐवजी मातीचा गाळ, गढूळ व अशुद्ध पाणी बाहेर पडत असल्याचे भयावह चित्र आहे.
या दूषित पाण्यामुळे परिसरातील लहान मुले, वृद्ध व महिलांना पोटाचे विकार, उलटी-जुलाब, ताप यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत असून अनेकांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली आहे.आरोग्याशी थेट खेळ सुरू असताना वनी नगरपरिषद मात्र हातावर हात ठेवून बसली आहे, असा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नागरिकांनी नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई नाही, पाहणी नाही, शुद्धीकरण नाही!महत्त्वाची बाब म्हणजे ही वसाहत Z.P कॉलनी म्हणून ओळखली जाते, मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असलेला भाग आहे, तरीही येथे नळातून येणारे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची साधी चाचणीसुद्धा होत नाही.
प्रश्न थेट C.O साहेबांना आणि वणी नगरपरिषदेला —
साहेब हेच पाणी तुमच्या घरच्या नळाला आलं असतं, तर तुम्ही पिलं असतं का?अशुद्ध पाणीपुरवठा म्हणजे प्रशासनाची निष्क्रियता, नागरिकांच्या जीवाशी खेळ आणि भविष्यातील मोठ्या आरोग्य संकटाला खुले आमंत्रण आहे.
तत्काळ पाणीपुरवठा बंद करून तपासणी, लाईन फ्लशिंग, शुद्ध पाणीपुरवठा व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास जनआक्रोश उभा राहील, याची जबाबदारी पूर्णपणे वनी नगरपरिषदेची असेल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.वनी नगरपरिषद झोपेतच आणि विनायक नगर संकटात आहे.

