अजय कंडेवार,वणी:- मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य असून, हे शाश्वत सत्य कुठल्याही जीवाला चुकत नाही मग तो राजा असो अथवा रंक, मृत्यूला सगळ्यांनाच सामोरे जावे लागते. कुटुंबातील लहान असो अथवा वयाने थोर कुणाचेही मृत्यू झाल्यास त्या कुटुंबावर प्रचंड मानसिक आघात होत असतो. आप्त स्वकियांशी भावनिकरित्या घट्ट नाते असलेल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती नैसर्गिक अथवा अपघाताने मृत्यू पावल्यास कुटुंबातील सदस्यांसाठी मृत्यूला सामोरे गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी वर्षानुवर्षे हृदयामध्ये साठविलेल्या असतात.
जन्मदिवशी अथवा मृत्यूच्या दिवशी मृतात्म्याच्या पावन स्मृती जागवण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन स्वकियांकडून केले जाते. अश्यातच वणी तालुक्यातील राजूर गावातील मोहन पुरंदास घोडेस्वार हे अतिशय शांत आणि मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून गावात परिचित होते.मागिल चार वर्षाअगोदर मोहन पुरंदास घोडेस्वार अल्प आजाराने निधन झाले होते. स्व.मोहन घोडेस्वार यांच्या चौथ्या स्मृतिदिनी त्यांच्या पत्नी पुष्पा मोहन घोडेस्वार व चिरंजीव आशिष घोडेस्वार कुटुंबीयांच्या वतीने ता.4 में 2024 रोजी श्री.बाजीराव महाराज वृध्दाश्रम, पळसोनी येथील वृद्धाश्रमा मधील वृद्धांना भोजनदान देऊन मृतात्म्याच्या स्मृती जागविल्या गेल्या. भविष्यात येणार्या प्रत्येक स्मृती दिनी असे सेवाभावी कार्यक्रम राबविण्याचा मानस चिरंजीव आशीष घोडेस्वार यांनी व्यक्त केला.