Ajay Wani : काम कोणतेही असो, ते प्रत्यक्ष मैदानात उतरून करण्यावर भर देणारे शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर पुन्हा एकदा आपल्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत आले आहेत. नियोजन करताना काटेकोरपणा आणि परिस्थिती हाताळताना तत्परता यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनवरांनी बाबापूर येथील नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन यंदा तब्बल १०० पोलीस मित्रांची टीम तयार केली आहे.
बाबापूरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यात दररोज महाप्रसादाचे आयोजन होत असल्याने गर्दीत आणखी भर पडते. अशा परिस्थितीत वाहतूक नियंत्रण, भाविकांच्या रांगा, पार्किंग, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता तसेच गर्दीतील संभाव्य गोंधळावर नियंत्रण ठेवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. ही बाब लक्षात घेऊन मनवरांनी केवळ पोलिसांच्या मनुष्यबळावर अवलंबून न राहता स्थानिक युवक-युवतींची ताकद पोलीस मित्रांच्या माध्यमातून नियोजनात उतरवली आहे.
गणेशोत्सवातील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलीस मित्रांना आवश्यक सूचना देऊन विविध ठिकाणी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली हे युवक-युवती भाविकांना रांगेत दर्शन, वाहतूक व गर्दीचे नियोजन यामध्ये सहकार्य करीत आहेत. त्यामुळे पोलिसांचे मनुष्यबळ अधिक संवेदनशील ठिकाणी केंद्रित करता येत असून, ‘पोलीस मित्र’ ही जुनी संकल्पना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष व्यवस्थापनात उतरविण्याचा मनवरांचा प्रयोग बाबापूरमध्ये लक्षवेधी ठरत आहे.

