Wednesday, August 26, 2026
HomeUncategorizedकवडशीच्या जि.प. शाळेची भिंत कोसळली...

कवडशीच्या जि.प. शाळेची भिंत कोसळली…

Ajay,Wani :- तालुक्यातील कवडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या धोकादायक इमारतीची भिंत सोमवारी सकाळी शाळा सुरू असतानाच अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही; मात्र शाळेतील २३ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेतील दोन वर्गखोल्या अत्यंत जीर्ण व धोकादायक झाल्या असून, याबाबत डिसेंबर २०२५ पासून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यापूर्वीही धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता.

भिंत कोसळल्यानंतर घटनास्थळी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, केंद्रप्रमुख व पालक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती देण्यात आली. धोकादायक इमारतीबाबत वारंवार सूचना करूनही ठोस कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘विद्यार्थ्यांचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?’ असा संतप्त सवाल उपस्थित करत धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. यापूर्वीही जिल्हा प्रशासनाकडे अनेक निवेदने देऊनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

कवडशी शाळेतील २३ विद्यार्थ्यांच्या जीविताची जबाबदारी निश्चित करून धोकादायक इमारतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, दोन नवीन वर्गखोल्यांना मंजुरी द्यावी, धोकादायक खोल्यांचे बांधकाम पाडावे तसेच नवीन इमारत होईपर्यंत विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या शेडची व्यवस्था करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विजय पिदूरकर, महादेव दातारकर, वंदना काकडे, संध्या ढुमणे, छाया चिचडे, चंद्रकांत भेंडाडे, सुलोचना बुच्चे, रेश्मा वासेकर, विद्या दिनेश येटे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page