Ajay Kandewar,Wani :- तालुक्यात ग्रामसमृद्धी, नैतिक मूल्यांची जोपासना, संतविचारांचा प्रसार व सामाजिक प्रबोधन या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘वारी प्रबोधनाची’ या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवार, दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता परमडोह येथील श्री नारायण बाबा देवस्थान येथून मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे. देवस्थानात विधिवत पूजा-अर्चा करून वारीचा शुभारंभ करण्यात येणार असून, या उपक्रमामुळे संपूर्ण तालुक्यात भक्तीमय व प्रबोधनात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मधुकर वाभिटकर, स्वागताध्यक्ष म्हणून रुपलताताई निखाडे, उद्धाटक म्हणून गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सप्त खंजिरी वादक, राष्ट्रीय कीर्तनकार इंजी. भाऊसाहेब थुटे, मोझरी येथील श्रीगुरुदेव गुरुकुलचे संचालक रवी मानव, श्रीगुरुदेव युवा मंचाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक, श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर, युवा प्रबोधनकार राज घुमणार आणि तेलंगणा राज्याचे प्रचारक डॉ. उदार महाराज उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संजय निखाडे, विठ्ठल डाखरे महाराज, नेताजी पारखी, संतोष वऱ्हाटे, कवडू वडस्कर, संकेत गज्जलवार यांच्यासह परिसरातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी ग्रामस्थ, उपासक-उपासिका, विविध भजन मंडळे, महिला भारुड मंडळे तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ‘वारी प्रबोधनाची’ अंतर्गत गावोगावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर, भजन, कीर्तन, भारुड, प्रवचन व सामाजिक विषयांवरील प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले जाणार असून, स्वच्छता, व्यसनमुक्ती, एकोपा, नैतिक मूल्ये व ग्रामविकासाबाबत जनजागृती केली जाणार आहे. वारीच्या स्वागतासाठी तालुक्यातील अनेक गावे सज्ज झाली असून, या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावकरी व श्रीगुरुदेव भजन मंडळ परिश्रम घेत आहेत.

