Ajay kandewar,Wani :- वणी विधानसभेचे माजी आमदार तसेच शिवसेना (शिंदे गट) चे चंद्रपूर–वणी–आर्णी लोकसभा संपर्क प्रमुख विश्वासभाऊ रामचंद्र नांदेकर यांचे रविवारी रात्री ११ चा दरम्यान मुंबई येथे दुःखद निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना अचानक प्रकृती खालावल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.
धडाडीचे, लढवय्ये आणि संघटन कौशल्यात निष्णात नेते अशी त्यांची ओळख होती. २००४ ते २००९ या काळात त्यांनी वणी विधानसभेचे आमदार म्हणून नेतृत्व केले. एका शिक्षकी पेशातून राजकारणात आलेल्या विश्वासभाऊंनी जिल्हा परिषद सदस्य → आमदार → लोकसभा संपर्क प्रमुख असा संघर्षमय व प्रेरणादायी राजकीय प्रवास केला.शिवसेना मजबूत करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर झटले. संघटनेवर एकहाती पकड, प्रशासनावर वचक आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळा हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील आणि जनतेसाठी सदैव धावणारे लोकनेते म्हणून ते वणी विधानसभा क्षेत्रात लोकप्रिय होते.
मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर मागील एक महिन्यापासून ते लीलावती रुग्णालयात उपचार घेत होते. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती.त्यांच्या निधनाने वणी विधानसभा क्षेत्रात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली असून शिवसेनेने आपला एक निष्ठावान वाघ गमावला आहे.“सेनेचा वाघ हरपला” अशी भावना आज कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उमटत आहे.अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव वणी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

