Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील राजूर गावात शासनाच्या समाजकल्याण निधीतून उभारलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन आज जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत पोहोचले असून, या परिस्थितीस ग्रामपंचायत राजूरची दुर्लक्षपूर्ण प्रशासकीय भूमिका थेट जबाबदार असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. ठरावानुसार देखभाल, दुरुस्ती व वापरयोग्य स्थिती राखण्याचे कर्तव्य ग्रामपंचायतीवर असतानाही वर्षानुवर्षे या जबाबदारीकडे पाठ फिरवण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे.
दि. 23 जून 2014 च्या मासिक सभेतील ठरावानुसार भारतीय बौद्ध महासभेची दीक्षाभूमीवरील 1200 चौरस मीटर जागा ग्रामपंचायतीच्या नावे हस्तांतरित करण्यात आली. त्यावर शासन निधीतून सामाजिक भवन उभारण्यात आले. यानंतर या सार्वजनिक मालमत्तेची निगा,दुरुस्ती आणि नियमित देखभाल करणे हे ग्रामपंचायतीचे वैधानिक कर्तव्य होते. मात्र प्रत्यक्षात ही जबाबदारी केवळ कागदावरच राहिल्याचे आजच्या अवस्थेतून दिसून येते.
भवनाच्या भिंतींना भेगा पडलेल्या आहेत, शटर व खिडक्या मोडकळीस आलेल्या आहेत, रंगरंगोटीचा अभाव आहे आणि परिसरात काटेरी झुडपे वाढलेली आहेत. विद्युत मीटर व लाईन नसल्यामुळे भवन वापरणे अशक्य झाले आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेली ही वास्तू वापराअभावी पडून राहणे म्हणजे निधीच्या उद्देशालाच हरताळ फासण्यासारखे असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर राजूर अमृत फुलझेले यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन देत तात्काळ दुरुस्ती, रंगकाम, विद्युत व्यवस्था व परिसर स्वच्छतेची मागणी केली आहे. ही कामे तातडीने न केल्यास ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेबाबत उच्चस्तरीय तक्रारी दाखल केल्या जातील, असा स्पष्ट संकेतही देण्यात आला आहे.सार्वजनिक मालमत्तेची देखभाल करणे हे ग्रामपंचायतीचे मूलभूत प्रशासकीय कर्तव्य असताना, अशा प्रकारचे दुर्लक्ष हे गंभीर मानले जात आहे. आता ग्रामपंचायत राजूर याकडे गांभीर्याने पाहते की पुन्हा वेळकाढूपणाची भूमिका घेते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दिशा फुलझेले,आकाश बोलगलवार,बंटी वाडके,शिनू दासारि ,प्रतिमा दुधे यांचा निवेदनात सह्या आहेत.

