Ajay Kandewar, Wani :- यवतमाळ जिल्ह्यातील मोरथ वाकोडी (वाडी) येथे आज सकाळी दहाच्या सुमारास कायद्याची धज्जी उडवणारी खळबळजनक घटना घडली. नदीपात्रातील अवैध रेती तस्करीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिस पथकावरच मुजोर तस्करांनी थेट हल्ला चढवला. ट्रॅक्टर जप्तीसाठी गेलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे यांना “कारवाई का करता?” अशी धमकी देत आरोपींनी पकडून बेदम मारहाण केली.
क्षणात परिस्थिती बिघडली. स्वतःचा आणि पथकाचा जीव वाचवण्यासाठी API अंबुरे यांनी धडाकेबाज प्रत्युत्तर देत दोन राऊंड फायर केले. त्यात आरोपी गुलाब खाजा शेख याच्या हाताला गोळी लागून तो जखमी झाला. मात्र गोळी लागूनही तो पसार झाला असून आणखी तीन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
या हल्ल्यात API सुनील अंबुरे स्वतःही जखमी झाले असून सवना येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात तीव्र तणाव पसरला आहे. पोलिसांनी संपूर्ण भागात नाकाबंदी करत शोधमोहीम सुरू केली असून फरार तस्करांना उरले नाही, असा ठाम इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.विशेष पोलिस पथक मैदानात उतरले असून रेती माफियांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी युद्धपातळीवर कारवाई सुरू आहे. कायद्यावर हात टाकणाऱ्यांना यावेळी कोणतीही सूट नाही—वाकोडीतील या थरारक घटनेनंतर पोलिसांचा कडक पवित्रा स्पष्ट दिसून येत आहे.

